ठाणे : लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप महायुतील बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांमध्ये एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे त्यांनी गेल्याच महिन्यात मराठवाडा आणि विदर्भ दौराही केला आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात करतानाच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून पहिला उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर, एकापाठोपाठ एक असे एकूण 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात मनसेनं आघाडी घेतल्याचं दिसून आलं. आता, निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून पुढील काही दिवसांतच उमेदवार जाहीर होणार आहेत. तत्पूर्वीच, मनसेकडून ठाणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहेत. राज ठाकरेंचे 4 शिलेदार ठाणे जिल्ह्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्धही मनसेचा (MNS) उमेदवार असणार आहेत.
लोकसभा निवडणुकांवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर, काही ठराविक उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठीही जाहीर सभा घेत निवडून देण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिक व मतदारांना केलं होतं. मात्र, आता विधानसभा निवडणुकांमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध मनसेकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ठाण्यात मनसे चारही मतदारसंघात निवडणूक लढणार असून एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाडांविरुद्ध इच्छुक उमेदवारांची नावेही समोर आली आहेत.
मनसेनं ठाण्यातून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अभिजीत पानसे यांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. ठाणे शहर मतदार संघात भाजपच्या संजय केळकर, ओवळा माजिवडा मतदार संघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि कळवा मुंब्रा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मनसे निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. पण, स्थानिक पातळीवर चारही जागा लढण्याची तयारी मनसेच्या नेत्यांनी दाखवली आहे.
कोण कोणाच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता
1. एकनाथ शिंदे विरोधात अभिजित पानसे
2. संजय केळकर विरोधात अविनाश जाधव
3. प्रताप सरनाईक विरोधात संदीप पाचंगे
4. जितेंद्र आव्हाड विरोधात सुशांत सूर्यराव
हेही वाचा
दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून 2 उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी