Lok Sabha elections 2024 Phase Three : देशासह राज्यात आज लोकसभा निवडणुकांसाठीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदानाची रणधुमाळी रगतांना दिसत आहे. या निवडणुकांमध्ये मैदान मारण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनातील सर्व स्थरातील यंत्रणा देखील कामाला लागली आहे.


असे असले तरी राज्यातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी थेट मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आज राज्यात अकरा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान झाले आहे. मात्र या अनेक गावातील मतदारांनी थेट मतदानावरच बहिष्काराचे शस्त्र उगारल्याने त्याचा थेट फटका मतदानाच्या टक्केवारी आणि उमेदवारांना देखील बसण्याची शक्यता आहे.   


रायगडच्या सहा गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार


रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यांतील वरसई येथील गावकऱ्यांनी बाळगंगा धरण प्रकल्पाबाबत सरकारकडे योग्य मोबदला मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांच्या या मागण्यांना सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी आज पार पडणाऱ्या निवडणुकीवर  बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. आज सर्वत्र होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीवर या बहिष्काराचे पडसाद उमटताना दिसत आहेत. सकाळपासुन गावातली केवळ एका व्यक्तीने मतदान केलं असून वरसईसह ईतर सहा गावातील एकाही गावकऱ्यांनं मतदान केंद्रांकडे फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळे रायगड लोकसभेवर जवळजवळ 10 हजार मतांचा फरक पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


मतदान केंद्रावर शुकशुकाट


परिणामी, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे या गावकऱ्यांच्या भेटीला पोहचले. मात्र, त्यांनाही गावकऱ्यांनी न जुमानता आपण या निर्णयावर ठाम आहोत, असा दावा येथिल गावकऱ्यांनी केलाय. मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण विधानसभा मतदारसंघातील  बाळगंगा धरण  प्रकल्प ग्रस्तांचा मतदानावर  बहिष्कार कायम असल्याने या परिसरात असणाऱ्या जावळी, निफाड, वरसई  करोटी, निधवळी, वाशिवली, जाभूळवाडी,घोटे, अशा दहा मतदान केंद्रावर शुकशुकाट बघायला मिळत आहे. अद्याप एकही नागरिकाने मतदान केलं नसून गावकरी अद्याप घरीच थांबलेले पाहायला मिळत आहेत. 


साताऱ्याच्या खोडशी गावातील 102 कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार


सातारा लोकसभेच्या खोडशी गावातील 102 कुटुंबांनी अचानक मतदानावर बहिष्कार घातलाय. 1990 सालापासून पुनर्वसन रखडल्यानं या कुटुंबांनी आज सकाळी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. गावात एकूण 2800 मतदान आहे, त्यापैकी एक हजार मतदारांनी आज मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा या निषेध करण्यासाठी कुटुंबाने बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. 


लातूरच्या सांगवी सुनेगाव या गावात शून्य टक्के मतदान


लातूर जिल्ह्यातील सांगवी सुनेगाव या गावात आतापर्यंत एकाही नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला नाहीये. गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागणी पूर्ण न झाल्याने गावकऱ्यांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी आता पर्यंत या मतदानकेंद्रावर  शून्य टक्के मतदान झाले आहे.


लातूर नांदेड हायवे वर कट पॉईंट देण्यात यावा या मागणीसाठी गावातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारले आहे. सांगवी सुनेगाव येथील ग्रामस्थांची मागील अनेक दिवसापासून हायवेला कट पॉईंट मिळण्याची मागणी होती. मात्र प्रशासन काही केल्या ती पूर्ण करत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत या मतदानकेंद्रांवर गावातील एकही नागरिक या मतदान केंद्रांवर फिरकला नाहीये. या गावात 477 मतदार असून या सर्व मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


LokSabha Election 2024 : ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबा संतापले; बारामतीतील मतदान केंद्रावरील प्रकार