रायगड: रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये (Irshalwadi Landslide) मृतांची संख्या आतापर्यंत 29 इतकी झाली आहे तर 52 ग्रामस्थ अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. त्यात 48 पैकी 17 घरं गाडली गेली. त्यानंतर लगेचच म्हणजे गुरुवार पहाटेपासून बचावकार्याला सुरूवात झाली. आज बचावकार्याचा चौथा दिवस असून सकाळपासून दोन मृतदेह काढण्यात आलेत. दरम्यान दरड दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं आहे. तर सोमवारपासून रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना बंदी
इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळांचे ठिकाणी आणि त्याच्या परिसरात इर्शाळगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार दिनांक 23 जुलै ते दिनांक 6 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत.
मृतदेह कुजल्यास जागीच करावे लागतील पंचनामे
माळीण येथील घटनेप्रमाणे रायगडमधील मागच्या घटनेतही मृतदेह बाहेर काढता न आल्याने ते तिथेच कुजले होते आणि त्याच ठिकाणी त्यांचे पंचनामे करावे लागले होते. इर्शाळवाडीत देखील आता त्याचप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढू शकतो असंही ते म्हणाले.
दरडग्रस्त यादीत इर्शाळवाडी नव्हतं
धोक्याच्या यादीत इर्शाळवाडी गाव नव्हतं, अचानक हे संकट कोसळलं असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. एवढं मोठं संकट येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं त्या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा म्हटल्याचं महाजन म्हणाले. अतिवृष्टी, पाऊस आणि वादळामुळे हा डोंगर कोसळल्याचं ते म्हणाले. धोकादायक डोंगर आणि त्याखाली वस्ती अशा धोक्यांच्या यादीमध्ये ही वाडी नव्हती, मात्र दुर्दैवाने या ठिकाणी ही मोठी घटना घडल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
ही बातमी वाचा :