Irshalwadi Landslide :  बुधवारी रात्री इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. तिसऱ्या दिवसाचे बचावकार्य थांबवण्यात आले असून मृतांची संख्या 27 झाली आहे. एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अडकलेल्या लोकांना शोधण्याचे काम सुरू आहे. अजूनही जवळपास 80 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 


इर्शाळवाडी परिसरात सततचा सुरू असलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कुठलीच मशिनरी याठिकाणी पोहोचू शकत नसल्याचंही महाजन म्हणाले. हाताने दुर्घटनास्थळावरील माती बाजूला करावी लागत आहे आणि त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 


उद्धव ठाकरे यांचा दौरा 


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) हे आज सकाळी इर्शाळवाडीतील (Irshalwadi) दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी पोहचले. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर दिला आहे. पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी आहोत, असे आश्वासन  यावेळी उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले. तुमचं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी आहोत अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. 


इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना बंदी 


इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळांचे ठिकाणी आणि त्याच्या परिसरात इर्शाळगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार दिनांक 23 जुलै ते दिनांक 6 ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत.


कसारा गावातील ग्रामस्थ भितीच्या सावटाखाली


इर्शाळवाडीतील घटनेनंतर कसारा गावातील गावकरीही भितीच्या सावटाखाली आहेत. डोंगराळ भागात वसलेल्या 250 घरांना स्थलांतराच्या तसेच सतर्क राहण्याची नोटीस तहसीलदार आणि ग्रामपंचायतीने बजावली आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालय व समाजसभागृहांमध्ये स्थलांतरितांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. 


इर्शाळवाडीतील मृतांची नावे: 


१) विनोद भगवान भवर , (पुरुष) वय - 4 वर्ष
२) रमेश हरी भवर , (पुरुष ) वय- 25 वर्ष
३) जयश्री रमेश भवर, (स्री) (वय)- 22 वर्ष
४) रूद्रा रमेश भवर, (पुरुष) वय - 01 वर्ष
५) जीजा भगवान भवर,(पुरुष) वय- 23 वर्ष
६) आंबी बाळू पारधी,  वय - 45 वर्ष
७) बाळू नामा पारधी - (पुरुष) वय 52 वर्ष
८) सुमित भास्कर पारधी - (पुरुष) वय - 3 वर्ष
९) सुदाम तुकाराम पवार,(पुरुष ) वय - 18 वर्ष
१०) दामा सांगू भवर, (पुरुष) वय- 40 वर्ष
११)चंद्रकांत किसन वाघ, (पुरुष) वय - 17 वर्ष
१२) राधी रामा भवर, (स्री) वय -37 वर्ष 
१३) बाळी नामा भूतब्रा, (स्री)-  30 वर्ष
१४) भास्कर बाळू पारधी, (पुरुष) - 38 वर्ष
१५)पिंकी (ऊर्फ) जयश्री भास्कर पारधी, (पुरुष) वय - माहीत नाही
16) अन्वी भास्कर पारधी,(स्री) वय - 1 वर्ष
17 ) कमल मधु भुतांब्रा, (स्री) वय- 43 वर्ष
18 ) कानी रवी वाघ, (स्री) वय- 45 वर्ष
19 ) हासी पाडुरंग पारधी, (स्री) वय - 50 वर्ष 
20 ) पाडुरंग धाऊ पारधी, (पुरूष) वय - 60 वर्ष
21) मधु नामा भुतांब्रा, (पुरुष) वय - 45 वर्ष
22 ) रविद्र पदु वाघ, पुरूष (वय) - 24 वर्ष
23) नांगी किसण पिरकड स्री वय -50 वर्ष
24) पिंकी रमेश  पारधी (स्त्री) वय - 25 वर्ष
25 )कृष्णा किसण पिरकड पुरूष (वय) 32 वर्ष
26 ) भारती मधू भुतांब्रा ( स्री ) वय -22 वर्ष
27) ओळख पटली नाही...