Raigad Crime News: राज्यात 'स्वच्छता हीच सेवा' (Swachhata Hi Seva) उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी हा उपक्रम साजरा केला जात आहे. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही स्वच्छता सेवा अभियानात सहभाग घेतला आहे. रायगडमध्ये मात्र 'स्वच्छता हीच सेवा' उपक्रम राबवत असताना चरसची पाकिटं आढळून आली आहेत. रायगड-अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर सापडली चरसची पाकिटं आढळून आली. स्वच्छता मोहीम सुरू असतानाच चरसची 10 पाकिटं सापडली. यापूर्वी देखील रायगडच्या समुद्र किनाऱ्यालगत चरस सापडण्याच्या घटना घडल्या होत्या. गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता सुरू असतानाच पाकिटं सापडली आहेत.
गेल्या महिनाभरात रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर चरस असणाऱ्या पिशव्या सापडल्या आहेत. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेनं राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्र किनाऱ्यावर चरस असणाऱ्या पिशव्या सापडल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना संपर्क करून या चरस असणाऱ्या सुमारे आठ पिशव्या निदर्शनात आणून दिल्या. पोलीस अधिक्षकांनी तातडीनं पंचनामा करून परिसरात शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी सकाळी सात वाजल्यापासून रायगड जिल्हा परिषदेनं वरसोली समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. मुख्य किनाऱ्यावर स्वच्छता करताना एका कर्मचाऱ्याला एक प्लॅस्टिकची मोठी पिशवी आढळली. त्यावर कचरा असल्यानं ती बाहेर काढण्यात वेळ गेला. बाहेर काढलेल्या पिशवीमध्ये अजून सुमारे आठ पिशव्या सापडल्या. या सर्व पिशव्यांमध्ये चरस असण्याची शक्यता उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आणि तातडीनं जिल्हा पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. त्या पिशव्यांमध्ये चरस असल्याचं निष्पन्न झालं.अशाच प्रकारच्या पिशव्या गेल्या महिन्यात रायगड किनाऱ्यावर सापडल्या आहेत. तब्बल आठ कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त, 'स्वच्छता हीच सेवा' या राज्यव्यापी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीवर स्वच्छता केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवडी किल्ल्यावर तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत स्वच्छता सेवा अभियानात सहभाग घेतला.