रायगड: लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होऊ शकतो अशी चर्चा असताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भरत गोगावले (Bharat Gogawale) हे जरी तांत्रिकदृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्री आहेत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. भरत गोगावले हे भविष्यात दृश्य स्वरुपातील पालकमंत्री  होतील असंही ते म्हणाले. रायगडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भरत गोगावले यांच्याबद्दलचे हे वक्तव्य केलं.


विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. या विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांचा नंबर जवळजवळ निश्चित असल्याची चर्चा आहे.


गोगावलेंना मंत्रिपदापासून हुलकावणी


राज्यात ज्या वेळी एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आलं त्यावेळेपासून भरत गोगावले यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याचं दिसून येतंय. शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांचं नाव निश्चित असताना काही कारणामुळे त्यांना संधी नाकारली गेली. त्यानंतरही प्रत्येकवेळी भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा झाली. आताही त्यांच्या नावाची चर्चा आहे. 
 
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने तिन्ही पक्षातील काही आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत. तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. तसेच नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.


भरत गोगावले हे वेटिंवरच


रायगडमध्ये शिंदे गटाचे तीन आमदार असतानाही मंत्रिपद मिळाल नाही. तर नंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना मात्र मंत्रिपद आणि पालकमंत्रिपदही देण्यात आल्याने शिंदे गटात नाराजी होती. 


राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराची ज्या ज्या वेळी चर्चा होते त्या त्या वेळी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे नाव आघाडीवर असते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपद आणि रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार हे फिक्स असताना ऐनवेळी त्यांना थांबण्यास सांगितलं. तेव्हापासून भरत गोगावले यांना मंत्रिपदाची हुलकावणी सुरूच आहे. 


शिंदे गटानंतर सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला नऊ मंत्रिपदं देण्यात आल्याने शिंदे गटातील अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी पडलं. त्यामध्ये वाद असलेल्या रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांनी आपल्या मुलीला मंत्री बनवलं. त्यामुळे तटकरे हे कानामागून आले आणि तिखट झाले अशी काहीशी अवस्था गोगावलेंची झाली होती. 


ही बातमी वाचा: