रत्नागिरी: रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे तब्बल 16 तासांपासून ठप्प असलेल्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांना सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होईल, असे कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र, त्यामध्ये अपयश आल्याने आता रेल्वे प्रशासनाने विविध एक्सप्रेस गाड्यांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतुकीची सोय केली आहे. विविध स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसेसच्या (MSRTC bus) माध्यमातून इच्छित स्थळी सोडले जाणार आहे. सध्या रत्नागिरी स्थानकातून 25 एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. या बसेस पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.  एसटीच्या बसेसने अडकलेल्या प्रवाशांना थेट मुंबईत सोडले जाईल.

 

तत्पूर्वी काल रात्रीपासून ट्रेनमध्ये अडकून  पडलेल्या प्रवाशांचा रत्नागिरी स्थानकात उद्रेक पाहायला मिळाला. काल रात्रीपासून रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांच्या खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. तसेच शौचालयांमध्ये पाणी नसल्यानेही प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. तसेच रेल्वे प्रशासनाने काल रात्रीपासून कोणतीही ठोस माहिती दिली नाही. नाहीतर एव्हाना आम्ही पर्यायी मार्गाने गेलो असतो. रेल्वेकडून केवळ दोन तासांनी वाहतूक सुरु होईल, असे सांगितले जात होते.  त्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी प्रचंड संतापले होते. रत्नागिरी स्थानकात पोलिसांनी हस्तक्षेप करत या संतप्त प्रवाशांची समजूत घालण्याचा  प्रयत्न केला. 

 

खेड आणि विन्हेरे दिवाणखाटी या स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे माती रुळावर येऊन कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक सुरु करण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरु आहेत. याठिकाणी जेसीबी मशीन लावून ट्रॅकवरुन माती बाजूला सारली जात आहे. परंतु, जोरदार पाऊस सुरु असल्याने या मातीचा चिखल तयार झाला आहे. हा चिखल ट्रॅकवर पसरला आहे. याठिकाणी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले तरी ते अपुरे पडताना दिसत आहेत. 

 

अनेक एक्सप्रेस गाड्या वेगवेगळया रेल्वे स्थानकावर गाड्या थांबल्या असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. गरीब रथ एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकात उभी आहे. मंगलोर एक्सप्रेस कणकवली स्थानकात उभी आहे. मत्सगंधा एक्स्प्रेस वैभववाडी स्थानकात उभी आहे. तुतारी एक्सप्रेस आडवली स्थानकात उभी आहे. कोकणकन्या एक्सप्रेस विलवडे स्थानकात उभी आहे. 

 

तिकिटाचे पैसे मिळवण्यासाठी गोंधळ


रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला. तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस गाड्या अचानक रद्द केल्याने प्रवाशांची धांदल उडाली. या प्रवाशांनी तिकीटाचे पैसे परत घेण्यासाठी काऊंटरवर एकच गर्दी केली.  15 तास रत्नागिरी स्टेशन वरती थांबलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात आलेल्या एसटी बसेसमध्ये चढण्यासाठीही मोठी गर्दी झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था तोडू नका, बसमध्ये चढताना चेंगराचेंगरी करु नका, असे आवाहन पोलिसांकडून प्रवाशांना केले जात आहे. 

 

कोकण रेल्वे दिवाणखवटी येथे बोगदयाजवळ दरड कोसळल्याने मांडवी एकस दिवा पॅसेंजर यातील प्रवाशी यांना मुंबई येथे सोडण्याकरता करिता उपप्रबंधक यांनी केलेल्या मागणी नुसार खालीलप्रमाणे बस पुरवण्यात येत आहेत. 

 

रत्नागिरी स्टेशन- 40 बस

चिपळूण स्टेशन- 18 बस 

खेड स्टेशन- 10 बस

 

परीक्षा पुढे ढकलल्या


 

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याना अतिवृष्टीमुळे जाहीर झालेल्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीहित लक्षात घेता व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी दूर व ऑनलाईन शिक्षण केंद्र, मुंबई विद्यापीठ यांच्या ( सोमवार) दिनांक १५ जुलै २०२४ रोजी सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या रत्नागिरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. 


आणखी वाचा


कोकण रेल्वेच्या कोणत्या गाड्या रद्द, कोणत्या गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या? जाणून घ्या सविस्तर तपशील