पुणे : माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी, संभाजीराजे समर्थकांनी विशाळगडावर (Vishalgad) जाऊन तोडफोड आणि जाळपोळ केल्याने हिंसाचाराची घटना घडली. या घटनेवरुन आता राजकीय वाद-विवाद होताना दिसून येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीराजेंसह 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेवरुन विविध राजकीय नेत्यांनी भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या घटनेवर बोलताना संभाजीराजे छत्रतपतींना लक्ष्य केलं. तर, संभाजीराजेंनीही हसन मुश्रिफांनी (Hasan mushriff) मला पुरोगामीत्व शिकवू नये असे म्हटले होते. आता, पुन्हा एकदा संभाजीराजेंनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे.  


विशाळगडावरील हिंसाचाराव भाष्य करताना, शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्याला हे कृत्य शोभणारे नाही. शांतता राखणे गरजेचे आहे असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. विशाळगड अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना का घेतली हे त्यांनाच विचारले पाहिजे, असेही ते म्हणाले होते. त्यावेळी घोटाळे करणारे हसन मुश्रीफ यांनी का लक्ष घातले नाही. यासीन भटकळ येथे येऊन गेला होता तेव्हा ही सारी यंत्रणा कोठे होते, असा प्रति प्रश्नही संभाजीराजेंनी केला होता. आता, पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्यावर संभाजीराजेंनी पलटवार केला आहे. हसन मुश्रीफ माझ्यावर टीका करत आहेत, पण तुम्ही गडावर कधी गेला आहात का, किल्यासाठी निधी दिला आहे का?, असा सवाल संभाजीराजेंनी विचारला आहे. 


राज्यातील सर्व लोकांना कल्पना आहे की गडांवर मी काम करत आहे, गेल्या काही दिवसांपासून अनेकांची मागणी होती की मी विशाळगडावर काम करावं. दीड वर्षपूर्वी आम्ही गडाला भेट दिली, तेव्हा गलिच्छ प्रमाणे तिथं अतिक्रमण झाल्याचं पाहिलं. तिथल्या स्थानिक लोकांनी देखील मान्य केलं होत की अतिक्रमण झालं आहे. गडावर 158 अतिक्रमणे झाली होती, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की अतिक्रमण हटवा. पण, राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला आणि स्टे आला. लोकप्रतिनिधींनीच हा दबाव टाकला होता, तिथं धर्मचा नाही तर अतिक्रमणचा विषय होता. या गडाचा इतिहास मोठा आहे, हा गड स्वराज्याची एक राजधानी देखील होती. तिथं कत्तलखाना आणि अनेक नको ती दुकाने होती, अतिशय गलिच्छ अतिक्रमण झालं होतं, पार्ट्या होत होत्या. म्हणून मी आक्रमक झालो होतो, मी आधी सांगितलं होतं की काम करा, नाहीतर गडावर जाईल म्हणून मी आक्रमक झाला होतो. 


विशाळगडावर यासीन भटकळ राहिला


तिथं यासीन भटकळ राहिला आहे हे दुर्दैव, पालकमंत्री  आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील काही बोलले नाहीत. मग मी आक्रमक झालो यात काय चूक आहे, असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. आता माझ्यावर जातीचे आरोप केले जात आहेत,  अतिक्रमण हटवल मला आनंद आहे, हे आधीच व्ह्यायला पाहिजे होत. आता सगळे अतिक्रमण हटवत आहेत, काल एका दिवशी 70 अतिक्रमण हटवले आहेत. त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि शिव भक्तांचे आभार व्यक्त करतो, असेही संभाजीराजेंनी म्हटले.