रायगड : मंत्री कधी होणार या प्रश्नाने हैराण झालेल्या भरत गोगावलेंना मंत्रिपद तर मिळालं. पण त्यानंतर दुसराच प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांमधून विचारला जात होता. मंत्री तर झालात आता हेलिकॉप्टरने प्रवास कधी करणार असं गोगावलेंना सातत्याने विचारण्यात येत होतं. आता तोही प्रश्न सुटला. भरत गोगावलेंच्या हेलिकॉप्टरने रायगडवरून उड्डाण भरले आणि मुंबईच्या दिशेने गेलं. त्यामुळे मंत्रिपदानंतर आता हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्याचा शब्द साहेबांनी खरा करून दाखवला अशी चर्चा गोगावलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगल्याचं दिसतंय.
महाड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदापासून सातत्याने हुलकावणी मिळत होती. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेऊन मतदारसंघातील जनतेला त्यांचा शब्द खरा ठरवून दिला. मंत्री झाल्यानंतर गोगावलेंना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता आणि तो म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरने प्रवास कधी करणार?
या चर्चेलादेखील भरत गोगावले यांनी आता पूर्णविराम दिला आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर गोगावले यांनी आता हेलिकॉप्टरने प्रवास सुरू केला. रविवारी भरत गोगावले यांचे त्यांच्या मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी भरत गोगावले हेलिकॉप्टरने मुंबईला मीटिंगसाठी रवाना झाले. यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं.
पालकमंत्रिपदावरुन गोगावले-तटकरे वादाची शक्यता
रायगडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वाद होण्याची शक्यता आहे. या वादाचं कारण पुन्हा एकदा पालकमंत्रीपद हे असणार असल्याचं दिसतंय. पालकमंत्री आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अट्टाहास आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंच्या समर्थकांकडून भावी पालकमंत्रीचे बॅनर झळकवण्यात आलेत.
एकीकडे मंत्री आदिती तटकरेंच्या कार्यकर्त्यांकडून भावी पालकमंत्रीचे बॅनर झळकवत शुभेच्छा देण्यात आल्यात. तर दुसरीकडे मुंबई गोवा हायवेवर भरत गोगावलेंचे पालकमंत्री म्हणून बॅनर झळकलेत. त्यामुळे पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी वाचा: