मुंबई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणारे राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असल्याचे वृत्त 'कट्टा न्यूज' या वेबसाईटने दिले आहे. घरवापसीसाठी इच्छुक असलेल्या विखे पाटील यांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली असल्याचे देखील वृत्त आहे. खर्गे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विखे पाटलांनी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे कळवले असल्याची माहिती आहे. विखे पाटील यांनी जरी इच्छा दर्शवली असली तरी अंतिम निर्णय हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेच घेतील, असे विखे पाटील यांना कळवले गेले असल्याची देखील माहिती या वेबसाईटने दिली आहे.


विखेंना भाजपमध्ये घेतल्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. विखे पाटील यांना भाजपात घेऊन काही फायदा झाला नाही. झाला तो उलट तोटाच, अशा शब्दात माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच कोपरगाव, राहुरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार अनुक्रमे स्नेहलता कोल्हे आणि शिवाजी कर्डिले यांनीही विखेंचा फायदा झाला नसल्याचे सांगितले. विखे यांनी त्यांच्या मेहुण्याला कोपरगाव मतदारसंघातून अपक्ष उभे केले. मात्र, त्यांचं डिपॉजीट जप्त झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले होते. शिवाजी कर्डिले यांनीही भाजपला आयात लोकांचा तोटाच झाल्याचे सांगितले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यासंदर्भात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आजच बैठक झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते.

हेही वाचा - विखेंना भाजपात घेऊन तोटाच झाला; माजी मंत्री राम शिंदेंची इनकमिंगवर नाराजी
भाजपमधल्या नाराज नेत्यांच्या तक्रारींची दखल पक्षानं घेत मुंबईत एक बैठक घेतली होती. भाजपची पक्ष कार्यालयातील ही बैठक संपली असून उद्या नगर जिल्ह्यात भाजपची बैठक होणार आहे. यानंतरच विरोधातील तक्रारीवर निर्णय घेणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आजची बैठक सकारात्मक झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असतेच, त्यामुळे चर्चेतून नक्की मार्ग निघेल असही ते बोलताना म्हणाले. दरम्यान तक्रारीच्या सुरांवर बोलण्यास राधाकृष्ण विखे यांनी नकार दिला.

हेही वाचा- भाजपच्या बैठकीत सकारात्मक चर्चा, मुंबईतल्या भाजपच्या बैठकीनंतर राम शिंदे आणि विखेंची प्रतिक्रिया

दरम्यान एकूणच विखे यांची भाजपमध्ये गोची झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुन्हा ते काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. विखे पाटील हे फडणवीस यांचं सरकार असताना विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Vikhe Patil After floor test | विरोधीपक्षात बसल्याने माझा निर्णय चुकल्याचं नाही वाटत - राधाकृष्ण विखे