मुंबई : भाजपमधल्या नाराज नेत्यांच्या तक्रारींची दखल पक्षानं घेत मुंबईत एक बैठक घेतली होती. भाजपची पक्ष कार्यालयातील ही बैठक संपली असून उद्या नगर जिल्ह्यात भाजपची बैठक होणार आहे. यानंतरच विखेंविरोधातील तक्रारीवर निर्णय घेणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आजची बैठक सकारात्म झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक पक्षात थोडीफार नाराजी असतेच, त्यामुळे चर्चेतून नक्की मार्ग निघेल असही ते बोलताना म्हणाले. दरम्यान तक्रारीच्या सुरांवर बोलण्यास राधाकृष्ण विखे यांनी नकार दिला. दरम्यान बैठक सकारात्मक झाली एवढीच प्रतिक्रिया त्यांनी बैठकीनंतर दिली आहे.


भाजपमधल्या नाराज नेत्यांच्या तक्रारींची दखल पक्षानं घेतली आहे. कारण राम शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी आज मुंबईत भाजपची खलबतं सुरु आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही बैठत पार पडली. चंद्राकांत पाटील मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. विधानसभा निवडणुकीत पक्षातल्याच काही नेत्यांमुळं पराभव ओढवल्याची तक्रार राम शिंदेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. अप्रत्यक्षपणे त्यांनी आपल्या पराभवासाठी राधाकृष्ण विखे पाटलांना जबाबदार धरलं होतं.

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील आणि पुत्र खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यासंदर्भात मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड यांची बैठक झाली होती. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाशिक विभागाच्या बैठकीत राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रवर आरोप केले होते. अशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्वच पराभूत आमदारांनी विखे यांना लक्ष्य केलं होतं. ''पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्यांचा पराभव झाला,'' अशी टीकाही भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वेळोवेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जाहीर आपली खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीत कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेटही घेतली होती.

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळे

पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील नेत्यांच्या कारस्थानामुळेकारस्थानामुळेच झाला, असा आरोप खडसेंनी केला होता. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी आणि पंकजा यांना पाडले. निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला होता. पक्षविरोधी काम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. पंकजा आणि रोहिणी यांचा पराभव करून राज्यातील ओबीसी नेतृत्व मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहुजन समाजाला डावलण्यासाठीच हे कारस्थान करण्यात आलं आहे. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे उमेदवार कसे पराभूत झाले, त्यासाठी कुणी काम केले याची विश्‍लेषणवजा माहिती आणि तक्रारीही त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या आहेत, असं खडसे यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या : 

निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना जेपी नड्डांचं आश्वासन