Zika Virus: पुणे शहरातील झिकाचे (Zika Virus) रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, रुग्णसंख्या 66 वरती पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाचा (Zika Virus) संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस, घाण आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचं दिसून येत आहे.
पुणे शहरात झिका विषाणूचे (Zika Virus) एकूण 66 रुग्ण झाल्याने पुणेकरांसह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. यामध्ये 26 गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली आहे. झिका व्हायरसचा (Zika Virus) सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिला, लहान मुले आणि वृध्दांना आहे. झिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात खबरदारी घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बावधान येथील 19 वर्षीय गर्भवतीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग आढळून आला असून, शहरातील झिका विषाणूच्या संसर्गाची एकूण संख्या 66 झाली आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली आहे. चांदणी चौक, बावधन येथील 19 वर्षीय गर्भवतीची सोमवारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) पुणे येथून मिळालेल्या अहवालानुसार झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. तिचे नमुने 3 ऑगस्ट रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. पीएमसीचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांच्या मते ती 22 आठवड्यांची गर्भवती आहे.
शनिवार ते सोमवार दरम्यान, पुणे शहरात झिका विषाणूच्या (Zika Virus) संसर्गाची आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत ज्यात सहा गर्भवती महिला, कात्रज येथील एक 40 वर्षीय पुरुष आणि कोंढव्यातील 18 वर्षीय मुलाचा समावेश आहे. शनिवार ते सोमवार या कालावधीत झिका विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या सहा गर्भवती महिलांमध्ये शनिवार ते रविवार या कालावधीत पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये धानोरी येथील 33 वर्षीय महिला, खराडी येथील 23 वर्षीय महिला आणि 21 वर्षांच्या तीन महिलांचा समावेश आहे. तसेच, पांडवनगर, शिवाजीनगर येथील एका 22 वर्षीय महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पीएमसीने सोमवारी पाषाण येथील दोन गर्भवती महिलांचे झिका विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या महिलांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत.
20 जूनपासून पुणे शहरात 26 गर्भवती महिलांसह झिका विषाणूचे (Zika Virus) 66 रुग्ण आढळले आहेत, असे पीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराटे यांनी सांगितले. 20 जूनपासून पुणे जिल्ह्यात झिका विषाणूचे 73 रुग्ण आढळले असून त्यात पुणे शहरातील 66, पुणे ग्रामीणमधील पाच आणि पिंपरी-चिंचवडमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. तसेच, यापूर्वी पुणे शहरात झिका मुळे चार संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
झिका विषाणू संक्रमित एडिस डासाच्या चाव्याव्दारे प्रसारित होतो, जो डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या संसर्ग प्रसारित करण्यासाठी ओळखला जातो. ताप, पुरळ, अंगदुखी आणि सांधेदुखी यांचा समावेश होतो. गर्भवती महिलांमध्ये झिका विषाणूमुळे (Zika Virus) जन्मजात मायक्रोसेफली (असामान्य मेंदूच्या विकासामुळे डोके लक्षणीयरीत्या लहान असते), गुइलेन-बॅरे सिंड्रोम आणि इतर न्यूरोलॉजिकल गुंतागुंत होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.