Womens day vandana korade : जिल्हा परिषद शाळा... त्या शाळेची दुरवस्ता.. आणि शाळेत उपलब्ध नसलेल्या सोयीसुविधा याच्या बातम्या आपण आजपर्यंत पाहिल्या आहेत. मात्र या सगळ्या समस्या बाजुला ठेवत पुण्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी फाड फाड स्पॅनिश बोलताना दिसत आहेत आणि त्यांच्या शिक्षिका त्यांना थेट स्पेनला जायचं स्वप्न दाखवत आहेत. मजुरी करणाऱ्यांच्या मुलांना स्पेनची स्वप्न दाखवत असलेल्या शिक्षिकेचं नाव वंदना कोरडे असं आहे.
वंदना कोरडे या पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेत स्पॅनिश भाषा शिकवतात. स्पॅनिश भाषा शिकवणारी महाराष्ट्रातील ही एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षणाला अनेकजण नकार देतात. मोठमोठ्या आकड्याच्या फी भरून पालक लेकरांना मोठ्या शाळेत पाठवून मुलाचं भविष्य उज्वल करण्याची स्वप्न रंगवतात. त्यांची शिक्षण पद्धती, शिस्त, अभ्यास क्रम आणि शाळेत शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विदेशी भाषा पाहून पालकांना या हायक्लास शाळेची भूरळ पडलेली कायम बघायला मिळते. मात्र या शाळेतील शिक्षिका वंदना कोरडे विद्यार्थ्यांना मराठी, हिन्दी आणि इंग्रजीसोबत स्पॅनिश भाषा शिकवतात. शिवाय शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी स्पर्धेच्या काळात कमी पडू नये याची काळजी घेतात.
यूट्यूबवर पाहून स्पॅनिश शिकल्या...
ल़ॉकडाऊनमध्ये यूट्युबवर आणि उपलब्ध असलेल्या विविध अॅप्सवरुन त्या स्वत: स्पॅनिश भाषा शिकल्या. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी स्पॅनिशचे नोट्सदेखील सोप्या भाषेत तयार केले. भाषा शिकण कठिण असतं, मात्र बोलता बोलता ती भाषा येऊ शकते. त्यामुळे त्यांनी मुलांना एबीसीडी न शिकवता थेट रोजच्या वापरातील वाक्य आणि शब्द शिकवायला सुरुवात केली. आज त्यांच्यामुळे ही जिल्हा परिषद शाळेतील मुलं फाड फाड स्पॅनिश बोलतात.
या गावात मोलमजुरी करणाऱ्यांची मुलं या जिल्हा परिषद शाळेत शिकतात. त्यांना घरात खाण्यापिण्यासाठी रोजचा वेगळा संघर्ष करावा लागतो. स्वत: शिक्षित नसल्याने शिक्षणाबाबत जागृकता नाही. त्यात परदेशी भाषा, स्पेन देश हे माहीत देखील नाही. घरात साधा मोबाईल नाही. दिवसभर काबाडकष्ट करत असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळही नाही. त्यामुळे या मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी वंदना कोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षणाची धुरा हाती घेतली आहे.
'आपण मोलमजुरी करतो मात्र मुलांनीच्याही वाट्याला तेच आयुष्य येऊ नये, असं या गावातील प्रत्येक पालकाला वाटतं. आपल्या मुलाच्या शिक्षणातील प्रगती जेव्हा शिक्षक त्यांना सांगतात तेव्हा उर भरुन येतो. मुलीला स्पेनला जायचं आहे आम्ही परिस्थिती पाहून पाठवण्याचा प्रयत्न करु' असं पालक सांगतात.