पिंपरी चिंचवड : ‘ओपन बुक सिस्टम’ सुरु करण्याचा विचार आहे. या सिस्टममध्ये परीक्षेत विद्यार्थी पुस्तक घेऊन बसले पाहिजेत, असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले. ते पिंपरी चिंचवडमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते.

काय आहे ओपन बुक सिस्टम’?

‘एक प्रश्न-एक उत्तर’ ही पद्धत बंद करुन, ‘एक प्रश्न-अनेक उत्तरं’ ही संकल्पना आणायची आहे. अशावेळी विद्यार्थी परीक्षेत पुस्तक घेऊन बसला, तरी त्याला उत्तर लिहता येणार आहे. कारण विषयातलं ज्ञान मिळणं महत्वाचं आहे. ते वर्गाबाहेर बसून मिळू शकत नाही. यासाठी ‘ओपन बुक सिस्टम’ सुरु करायची आहे.”, असं विनोद तावडेंनी सांगितलं.

‘ओपन बुक सिस्टम’ अधिक समजावून सांगण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी व्यासपीठावर उपस्थित डी. वाय. पाटील, सतेज पाटील यांच्या नावांच्या आधारे उदाहरणे दिली. तावडे म्हणाले, “आपले शिक्षण माहिती प्रसारित करते. त्यामुळे ‘एक प्रश्न-एक उत्तर’ ही पद्धत बंद करायला हवी. असे प्रश्न परीक्षेत दिले पाहिजेत, ज्याचे अनेक उत्तरं असू शकतात. माझ्यासारखा दोन, सतेज पाटलांसारखे चार आणि डी. वाय. पाटील साहेबांसारखे आठ उत्तरं लिहतील. ज्याच्या-त्याच्या पद्धतीने जो-तो उत्तर लिहील.”

‘ओपन बुक सिस्टम’ जेव्हा देशात येईल, तेव्हा खऱ्या अर्थाने विद्यार्थी विषय समजून घेतील, असेही तावडे म्हणाले.

पुणे शिक्षणाचं माहेरघर?

पुण्यात वाढणाऱ्या लोंढ्यांवर बोलताना विनोद तावडे म्हणाले, “मला आश्चर्य वाटतं की, प्रत्येक व्यक्ती पुण्यात का येते. ऑक्सफर्ड वगैरे-वगैरे बोलायला बरं वाटतं. पुणे हे विद्याचे माहेर घर होतं? आहे का नाही? हे माहित नाही. त्यामुळे अनेक संस्था पुण्यात येतात.”

पालकांना शिक्षणमंत्र्यांचा सल्ला

“पालकांनी आपल्या जगात जगणं सोडून स्वतःच्या मुलाच्या क्वालिटी पाहायला हव्यात, समजून घ्यायला हव्यात, असा सल्ला तावडेंनी पालकांना दिला. तसेच त्यांनी असे आवाहन केले की, “मुलांशी संवाद साधा. मारुन चालणार नाही. मजा करण्याच्या वेळी मजा कर पण सध्या करिअर वर लक्ष दे. असा संवाद साधता आला पाहिजे.” शिवाय, परीक्षा बंद केल्याने आत्महत्या थांबतील असं वाटत नाही, असे मतही तावडेंनी नोंदवले.