पुणे : मुठा कालव्याची भिंत कोसळल्याने आजूबाजूच्या ज्या झोपडपट्टी पाणी शिरलंय, त्या भागात पंचनामे करुन मदत दिली जाईल, असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलं. तसेच, 40 ते 50 हजार लोकसंख्येच्या वस्तीत पाणी गेलं असल्याची माहितीही बापट यांनी दिली.


पालकमंत्री गिरीश बापट यांनी काय माहिती दिली?

मुठा कालव्याची गेल्या काही वर्षांपासून दुरुस्ती टप्प्या-टप्प्याने करत होतो. मात्र त्या ठिकाणी आज भराव खचल्याने कालवा फुटला, असे सांगत गिरीश बापट पुढे म्हणाले, “मुख्य खडकवासल्या धरणातून पाणी बंद करण्यात आलंय. कालवा 111 किलोमीटर लांबीचा आहे.”

“यावर्षी पुण्यात पाऊस भरपूर झालाय. जवळपास 90% धरणं भरली आहेत. कोणताही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. कालवा फुटल्यामुले कोणताही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही.”, असे सांगत बापट म्हणाले, “झोपडपट्टी भागात पंचनामा करून मदत दिली जाईल.”

दुर्घटना काय आहे?

पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळल्यामुळे पुण्यात हाहा:कार उडाला. सकाळी 11 च्या सुमारास जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. कालव्याचं पाणी इतकं प्रचंड वेगाने होता की, क्षणार्धात जनता वसाहतीतील घरं पाण्याने भरली. अनेकांचं कौटुंबीक साहित्य उद्ध्वस्त झालं. अचानक पाणी आल्याने नेमकं काय होतंय हे कळलं नाही. अक्षरश: घराच्या भिंती कोसळल्या. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून हा पाण्याचा प्रवाह सुरु होता. तो भाग उंचीवर असल्याने आणि पाण्याचा वेग प्रचंड असल्याने रस्ते अक्षरश: पाण्यात बुडाले.

पाणी प्रचंड वेगाने वाहात दांडेकर पूल आणि परिसरात पोहोचलं. काहीवेळातच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली.

VIDEO: कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर