पुणे: शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे पुणे शहरात सोमवारी (ता. 10) मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या तपासाने वेग घेतल्यानंतर, सावंत यांचा मुलगा दोन मित्रांसोबत खासगी विमानाने बॅंकॉकला जात असल्याची माहिती समोर आली. कायदेशीर कारवाई करत, त्या विमानाला पुणे विमानतळावर परत आणण्यात आले. मात्र, दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेल्या या नाट्याचा समारोप रात्री नऊ वाजता झाला. या प्रकारामुळे पोलिस आणि विमानतळ प्रशासनाची धावपळ झाली आणि यंत्रणेवर मोठा ताण पडला. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. ऋषिराज सावंत त्याच्यांसोबत आपल्या दोन मित्रांसोबत बॅंकॉकला निघाले होते. तब्बल 68 लाख रुपये खर्च करून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाले होते, अशी माहिती आहे. तर ते खासगी चार्टर्ड कोणाच्या मालकीचं आहे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
पुण्यातील ऑफिस गायब?
कारण या प्रायव्हेट चार्टर्डच्या तिकीटवर या Global Passenger Manifest या कंपनीचा पत्ता देण्यात आलेला आहे. सदाशिव पेठ flat no 101 अमृत सिद्धी अपार्टमेंट, लक्ष्मी पार्क, भिडे हॉस्पिटलच्या मागे या पत्त्यावर एबीपी माझाची टीम पोहोचली. मात्र, या पत्त्यावर पोहोचल्यानंतर इथं या कंपनीचं ऑफिसचं नव्हतं. त्या ठिकाणी एका खाजगी बिल्डरचं ऑफिस आहे. तीन ते साडेतीन वर्ष अगोदर या कंपनीचा ऑफिस या इमारतीत होतं. मात्र, त्यानंतर ते दुसरीकडे गेले आहेत, असं या इमारतीतील नागरिकांनी सांगितलं. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, याच कंपनीचं हे प्रायव्हेट प्लेन होतं का? ऋषिराज सावंत यांनी या कंपनीला नक्की किती पैसे भरले होते? बँकॉकला घेऊन जाण्यासाठी त्यांनी कधी बुकिंग केली होती?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
ज्या खासगी चार्टर्डने ऋषिराज सावंत बँकॉकला निघालेले होते. त्या खासगी चार्टर्डच्या ॲाफिसचा पत्ता नवी पेठ येथील आहे. त्या इमारतीमध्ये एबीपी माझाची टीम पोहोचली. पण, त्या ठिकाणी खासगी विमान भाड्यानं देणाऱ्यांचं कसलंही ऑफीस नसल्याचं निदर्शनास आलं आहे. दोन वर्षांपूर्वीच येथून ऑफिस दुसरीकडे हलवल्याची माहिती येथील काही नागरिकांनी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काल विमानतळ अॅथोरिटीला परवानगीसाठीचं जे पत्र देण्यात आलं होतं, त्या पत्रावरती याच पुण्यातील नवी पेठेतील इमारतीचा पत्ता आहे. त्यामुळे ही कंपनी अस्तित्त्वात आहे की नाही? हे विमान कोणाच्या मालकीचं आहे? यंत्रणेकडून या कंपनींची पडताळणी करण्यात आली की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.