पुणे : मिलिंद एकबोटेंना पोलिस कोठडीत घेऊन, त्यांची चौकशी करायची आहे, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.


विश्वास नांगरे पाटलांनी नेमकं काय सांगितले?

मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही, असा प्रश्न विश्वास नांगरे पाटील यांना विचारला असता, ते म्हणाले, “मिलिंद एकबोटेंना आधीच दिलासा मिळाला होता. त्याअनुषंगाने आम्हाला पोलीस कोठडी घेऊन, चौकशी करायची आहे. फक्त अटक करुन जामीन मिळू द्यायचा नाही. त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार 14 मार्चला ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू.”

काल सुप्रीम कोर्टात काय झालं?

काल मिलिंद एकबोटेंच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची बनवाबनवी सुप्रीम कोर्टात उघड झाली. एकबोटेंना आतापर्यंत का अटक केली नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने हास्यास्पद उत्तर दिलं. एकबोटे आम्हाला सापडलेच नाहीत, सातत्यानं गायब होते, या सरकारच्या दाव्याचा खुद्द एकबोटेंच्या वकिलांकडून इन्कार करण्यात आला. आम्ही पोलिसांकडे जायला तयार आहोत, त्यांना पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहोत, तेच बोलवत नाहीत. या उत्तरामुळे महाराष्ट्र सरकारच्या एकबोटे बचाव धोरणाचे सुप्रीम कोर्टात धिंडवडे निघाले.

सरकारनं या प्रकरणाचा तपास करुन गरज पडल्यास एकबोटेंना अटक करावी (अशा अटकेनंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केल्यास कोर्टानं असा अटकपूर्व जामीन 14 मार्चपर्यंत त्यांना मिळणार आहेच ) या तपासात एकबोटे कसं सहकार्य करतात, यावर त्यांच्या जामिनाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ असं कोर्टानं म्हटलं आहे.

एकंदरीत, मिलिंद एकबोटे कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी जेलमध्ये जाणार की नाही, ते 14 मार्च रोजीच ठरणार आहे.