पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडची (Walmik Karad) पिंपरीमध्ये मालमत्ता असल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील असलेल्या फ्लॅटचा कर वाल्मिक कराडने (Walmik Karad) थकवल्याची माहिती एबीपी माझाने काल(बुधवारी) समोर आणली होती. या फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याची माहिती देण्यात आली होती, या बातमीनंतर 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा थकलेला कर भरण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.


काही तासांतच दोन्ही फ्लॅटचा थकीत कर भरला


वाल्मिक कराडचे (Walmik Karad) पिंपरी चिंचवडमध्ये दोन अलिशान फ्लॅट असल्याची आणि त्या फ्लॅटचा कर थकवल्याचं एबीपी माझाने समोर आणलं होतं. त्यानंतर जाग्या झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने वाल्मिक कराडच्या एका फ्लॅटचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर कराड (Walmik Karad) कुटुंबियांची धावपळ उडाली. त्यांनंतर काही तासांतच कराड कुटुंबीयांनी दोन्ही फ्लॅटचा थकीत कर भरुन टाकला. पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता.


या फ्लॅटचा 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा कर थकलेला होता. जो आता भरण्यात आला आहे. तर एप्रिल 2016मध्ये पिंक सिटी रोडवरील मि कासा बिला सोसायटीतील टू बीएचके खरेदी करण्यात आला होता. मंजली कराडांच्या नावे असणाऱ्या फ्लॅटचा कर मात्र नियमित भरला जायचा, परंतु चालू वर्षाचा कर थकीत होता. 20 हजार 671 पैकी 9 हजार 687 रुपयांचा पहिला हफ्ता भरण्यात आला आहे. कराड कुटुंबीयांनी हे दोन्ही थकीत कर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात आले आहेत अशी माहिती आहे. आता मिळकत कर तर भरला गेला आहे, मात्र प्रश्न या मिळकती खरेदी करण्यासाठी वाल्मिक कराडने कोट्यवधींची रक्कम कुठून आणली? याचा तपास होण्याची गरज आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराड अन् पत्नीच्या नावे दोन फ्लॅट


पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे. 1 एप्रिल 2016 पासून हा फ्लॅट मंजली यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. हा फ्लॅट पत्नी मंजली वाल्मिक कराड यांच्या नावावर आहे. पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीत पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या अलिशान फ्लॅटचा आत्तापर्यंत एक रुपयांचा ही कर अदा करण्यात आला नव्हता.