पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये काढलेल्या शोभायात्रेत काहीच गैर नसल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेने केला आहे. इतकंच नाही तर शोभायात्रेविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवरच कारवाईची मागणीही केली आहे. शोभायात्रेच्या वादावर बोलण्यासाठी विहिंपने आज पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत उलटी भूमिका मांडताना पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद उरकली.

विश्व हिंदू परिषदेने पिंपरीत काढलेल्या सशस्त्र शोभायात्रेसाठी पोलिसांकडे परवानगी मागितल्याचा दावा केला आहे. मात्र शोभायात्रा आणि शौर्य प्रशिक्षण वर्गात तलवार आणि एअर रायफलचा वापर केला जाईल हे मात्र अर्जात नमूद केलं नव्हतं. यावर पत्रकारांनी शंका उपस्थित करताच हात जोडून विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.



विश्व हिंदू परिषदेतील मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत, हातात तलवारी मिरवत विनापरवाना शोभा यात्रा काढल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळात ही शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झालेले होते.

पिंपरीतील यमुनानगरमधील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल असल्याचं आढळून आलं होतं. शोभायात्रेवेळी एअर रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाजही आला. त्याचबरोबर पाच मुली हातात तलवारी मिरवत असल्याचं ही दिसून आलं होतं.

याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर आणि 200 ते 250 कार्यकर्त्यांचा गुन्ह्यात समावेश आहे.