पुणे : वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर ते आता कोणत्या पक्षात जाणार?, अशा चर्चा सुरु असतानाच मला सगळ्याच पक्षातून फोन आल्याचं वसंत मोरेंनी (Vasant More) सांगितलं आहे. सध्या मी कोणतीच राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना रात्री दोन दोन वाजता मनसेच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून फोन येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
'राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मला राजीनामा दिल्यानंतर फोन आले. मात्र ज्या पक्षाचा मी राजीनामा दिला आहे. ज्या त्रासामुळे पक्ष सोडावा लागला. मनसेचे कार्यकर्ते अजूनही नीट वागताना दिसत नाही आहे. माझ्या सोबत ज्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. त्या कार्यकर्त्यांना रात्री दोन वाजता फोनाफोनी सुरु आहे. त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरु आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेतून स्थिर व्हायला दोन तीन दिवस लागतील त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन', असं वसंत मोरे म्हणाले.
दरम्यान, वसंत मोरे यांनी मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्येही त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत वाॅशिंग मशिनचा मार्ग निवडू नये, असा टोला लगावला. त्यानंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून वसंत मोरेंना फोन येत आहेत शिवाय स्थिनिक नेत्यांनी देखील वसंत मोरेंनी भेट घेतली आहे. कॉंग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशींनी वसंत मोरेंची भेट घेतली आहे. तर अजित पवार गटाकडून रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील वसंत मोरेंची भेट घेतली आहे. मात्र त्यांनी अजून कोणताही निर्णय स्पष्ट केला नाही आहे.
मनसेत माघारी जाणार का?
सगळ्या पक्षात सध्या लोकसभेसाठी उमेदवारांची मोठी रांग आहे. वेळ आली तर मी अपक्षदेखील लोकसभा निवडणूक लढवणार, असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे. मनसेत माघारी जाणार का? विचारल्यावर माघारी फिरुन मला साहेबांना फसवायचं नाही आहे, असं ते म्हणाले आहेत.
25 वर्षात राज ठाकरे काहीही बोलले नाहीत मात्र अमित ठाकरे...
काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी पुण्यात विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी मोर्चा आयोजित केला होता. त्यानंतर वसंत मोरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. त्यावेळी फोन करुन अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना झापलं होतं. सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, अशी तंबी दिली होती. त्यानंतर वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मागील 25 वर्षात राज ठाकरे काहीही बोलले नाहीत मात्र अमित ठाकरे लगेत बोलले, असं ते म्हणाले. त्यामुळे वसंत मोरेंनी अमित ठाकरेंमुळे राजीनामा दिला का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इतर महत्वाची बातमी-