पुणे : आधी लॉकडाऊन, मग चक्रीवादळ, नंतर अवकाळी पाऊस आणि आता पुन्हा एकदा युकेसह इतर देशात सुरु होणारं लॉकडाऊन. यामुळं गुलाब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. व्हॅलेंटाईनडे तरी आपल्याला नफा मिळवून देईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांवर कोरोनाने संक्रांत आणली आहे. लॉकडाऊनपासून 20 कोटींचा तर आता व्हॅलेंटाईन डेला तब्बल तीस कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.


पुण्याच्या मावळ तालुक्यातील मुकुंद ठाकर यांच्या गुलाबाला परदेशात मोठी मागणी असते. पण यंदा मात्र कोरोनाने त्यांच्यावर संक्रांत आणली आहे. पंधरा वर्षांपासून गुलाबाची शेती करणारे मुकुंद यांनी गेल्या वर्षी व्हॅलेंटाईनडेसाठी तब्बल पाच लाख गुलाबांची निर्यात केली होती. या निर्यातीतून तब्बल पंच्याहत्तर लाखांची उलाढाल त्यांनी केली होती. पण यंदा परदेशात अद्याप कोरोना थैमान घालतोय, परिणामी गुलाबाच्या मागणीत चाळीस टक्क्यांनी घट झाली आहे. शिवाय फुलांच्या दरात कपातही झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती प्रत्येक गुलाब उत्पादक शेकऱ्यांची आहे.



यासंदर्भात बोलताना गुलाब उत्पादक शेतकरी मुकुंद ठाकर यांनी सांगितलं की, "गेल्या वर्षी आम्ही पाच लाख गुलाबांची निर्यात केली होती. त्याला परदेशी बाजारात पंधरा रुपयांचा दर मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ तीन लाख फुलांची निर्यात झाली, शिवाय दर केवळ बारा रुपयेच मिळाला. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्के म्हणजे पस्तीस लाखांचं नुकसान झेलावं लागलंय. विमान सेवा अद्याप ही सुरळीत न झाल्यानं ही परिस्थिती आमच्यावर उद्भवली आहे. तर दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाचाही फटका आम्हाला सहन करावा लागतोय. या आंदोलनामुळं अपेक्षित बाजारपेठेत गुलाब पोहचू शकत नाहीये. तो इतर बाजारात कवडीमोल किंमतीत द्यावा लागतोय."


मावळ तालुक्यातील सव्वा दोनशे हेक्टर क्षेत्रावर गुलाब फुल बहरतो. म्हणूनच देशातील गुलाब फुलाच्या उत्पादनात मावळ तालुक्याचा पन्नास टक्के वाटा असतो. याच वाट्यातील पस्तीस टक्के फुलांची निर्यात एकट्या युकेत होते. मात्र सध्या तिथं कोरोनामुळं लॉकडाऊन सुरु आहे. तर हॉलंडमध्येही लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही देशातील विमान सेवा ठप्प करण्यात आली आहे. दुसरीकडे हवाई मालवाहतुकीच्या दरात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं यंदा गुलाब फुलाच्या मागणीत पन्नास टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल तीस कोटींचा फटका सहन करावा लागेल, असा दावा इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्सचे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांच्याकडून केला जात आहे.


दरम्यान, 2020 या वर्षात एकामागेएक अशा अनेक संकटांनी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरक्षः कंबरडं मोडलं आहे. याची कसर या व्हॅलेंटाईन डेमधून भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली. मात्र ज्या परदेशी बाजारपेठेवर हा शेतकरी अवलंबून होता. तिथं पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्यानं हा शेतकरी मेटाकुटीला आला आहे.