Irshad Musical Program : कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा पुण्यात दिवाळीच्या दिवशी होणारा 'इर्शाद' हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 'इर्शाद' या नावावर आक्षेप घेत काही जणांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. काही जणांनी ‘इर्शाद’हे नाव बदलून ‘काव्य पहाट’केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. आता खुद्द कवी वैभव जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा कार्यक्रम रद्द केल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत वैभव जोशी यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी 'इर्शाद' या शीर्षकानेच भविष्यातही हा कार्यक्रम करावयाची इच्छा असल्याचेही सांगितलं. 


‘इर्शाद’या नावामुळे संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला काही जणांनी विरोध केल्याचं समोर आलं. यावरुन सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला होता. त्यातच कार्यक्रमाचं ‘इर्शाद’हे नाव बदलून ‘काव्य पहाट’केल्याची जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. ही जाहिरात नेमकी कशी आली, याबाबत माहित नसल्याचं वैभव जोशी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  मागील पाच वर्षांपासून रसिकांच्या भरभरून प्रतिसादासह इर्शाद हा कार्यक्रम होत आहे. भारतात आणि भारताबाहेरही याचे प्रयोग झाले आहेत. कुठल्याही निमित्ताने नव्हे तर  प्रामुख्याने मराठी कवितांसोबतच हिंदी, उर्दू कविताही यात सादर होत असल्याने, काव्यमैफलीला समर्पक अशा 'इर्शाद' या शीर्षकानेच भविष्यातही हा कार्यक्रम करावयाची इच्छा आहे. असं वैभव जोशी यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 


BLOG : इर्शाद आणि विषाद...


पाच नोव्हेंबरचा कार्यक्रम का रद्द? 
दिवाळीच्या दिवशी पाच नोव्हेंबर रोजी होणारा इर्शाद हा कार्यक्रम का रद्द करण्यात आला, याबाबत वैभव जोशी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, विचारांती नाव न बदलण्याचे ठरल्यावर हा कार्यक्रम आणि त्या नुसार साहजिकच पुढील जाहिरात रद्द करावी असे ठरले व त्या प्रमाणे वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी जाहिरात आली नाही ! बदललेल्या नावासह सोशल मीडिया वर प्रसिध्द झालेली जाहिरात ही मुळात कशी आली व कुणी केली हा आम्हालाही पडलेला प्रश्न आहे , परंतु ती सर्वसंमतीने झालेली अधिकृत जाहिरात नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर, 5 नोव्हेंबर 2021चा कार्यक्रम दुर्दैवाने रद्द झाला आहे. रसिकांच्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत !!  परंतु आपलं नातं हे शब्दांतून जुळलेलं आणि शब्दांपल्याड पोचलेलं आहे, या विश्वासासह लवकरच भेटू अशी आशा व्यक्त करतो, अशी पोस्ट वैभव जोशी यांनी केली आहे.