सभी के दीप सुंदर हैं हमारे क्या तुम्हारे क्या
उजाला हर तरफ़ है इस किनारे उस किनारे क्या..
इर्शादवरून जो गोंधळ माजवायचा होता तो माजवून झालाय. त्यातले काही बारकावे आपण समजून घेतले पाहिजेत.
जे विरोध करत होते त्यांची मुख्य भूमिका अशी होती की दिवाळी हा सण हिंदूधर्मीयांचा आहे तेंव्हा या निमित्ताने ठेवलेल्या गझल गीत गायन कार्यक्रमाचे शीर्षक फारसी उर्दू तत्सम भाषेत नको. यामुळे सांस्कृतिक आक्रमण होते आणि हिंदूंच्या अस्मितांना किंमत दिली जात नाही.
विरोध करणारी काही मंडळी म्हणत होती की दिवाळी पहाट, दिवाळी प्रभात दिवाळी काव्यमाला असे शीर्षक का दिले गेले नाही.
सण हिंदूंचा आहे तेंव्हा फारसी उर्दू भाषिक शीर्षक नको असा आग्रह ही मंडळी करत होती.
विरोधाचा यापेक्षा वेगळा युक्तिवाद माझ्या वाचनात आला नाही.
वास्तव काय आहे ? -
उत्तरभारतात बहुतांश राज्यात अस्खलित हिंदी बोललं जात नाही, तिथे उर्दू फारसी मिश्रित वा स्थानिक बोलीभाषेनुरूप (अवधी, भोजपुरी इत्यादी) तिचे प्रकटन होते. दक्षिणेत हिंदीचा सवालच नाही. उत्तरपूर्वेकडे हिंदीला प्राधान्य नाही. पश्चिम भारतातील गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यात गुंता अधिक आहे.
उत्तरेकडे जेंव्हा दिवाळी निमित्त गझल गायनाचे जे कार्यक्रम केले जातात त्याला शीर्षक त्यानुरूपच दिले जाते. तिथे हिंदू धर्म संकटात येत नाही कारण ती त्यांची तिथली भाषा आहे. गझल, काव्य वाचन यांचे जे कार्यक्रम दिवाळी निमित्त केले जातात त्याला महफिल, मुशायराच म्हटलं जातं. याला तिथले संस्कृतीरक्षकही अडवू शकत नाहीत कारण गझलेची रचनाच त्या शब्दांतली आहे.
मग तिकडे अस्मिता दुखावल्या जात नाहीत का?
Diwali Pahat 2021 : दिवाळीच्या दिवशी होणारा संदीप खरे-वैभव जोशींचा 'इर्शाद' कार्यक्रम रद्द
संस्कृत श्लोक पठणाचे, अभंग भजन गायनाचे कार्यक्रम ठेवले आणि त्याला कुणी मुशायरा म्हणत असेल तर तो विरोध समजू शकतो.
कुणी भावगीतांचे, भक्तीगीतांचे कार्यक्रम ठेवत असेल आणि त्याला इर्शाद, सजदा, महफील असं शीर्षक देत असेल तर तिथला विरोधही समजून घेता येतो.
मात्र जिथे गझल वाचन / गायन आयोजित केले जाते त्याचे शीर्षक गझलेच्याच परिभाषेत असले पाहिजे.
इर्शाद हा गझलेचा प्राण आहे त्याने शायराच्या विझणाऱ्या देहात देखील चेतना येते ! हा मुद्दा हेतुतः डावलला गेला.
बरे मग इथे इर्शादला विरोध केल्याने धर्मरक्षण होत असेल तर या शब्दशीर्षकास उत्तरेत विरोध व्हायला हवा होता, मात्र तिथे तसे होताना दिसत नाही.
वास्तवात इथे गल्लत झालीय वा केली गेलीय.
धर्माच्या आडून विरोध करताना हा मुद्दाच लक्षात घेतला गेला नाही की एखाद्या उर्दूभाषिक व्यक्तीस दिवाळी साजरी करायची असल्यास त्याने ती कशा भाषेत करावी ? इथे केवळ भाषेला धर्माचे प्रतीक मानले गेले आणि विरोध केला गेला. उर्दू ही भाषा एका धर्माचे प्रतीक मानून इथे विरोध केला गेलाय हे त्रिवार सत्य आहे.
विरोध भाषेला होता तर हिंदूंचा सण आहे हा युक्तिवाद अनाठायी ठरतो. उर्दू हिंदी बोलणारे उत्तरेकडील हिंदू हा विरोध अस्थानी ठरवतील.
कार्यक्रम महाराष्ट्रात आहे म्हणून उर्दू शीर्षक चालणार नाही अशी भुमिका असेल तर धर्मअस्मितेची कवच कुंडले वापरता कामा नये.
महाराष्ट्रात कार्यक्रम आहे म्हणून मराठीभाषिक शीर्षक हवे हा आग्रह ही एखाद्या वेळेस मान्य होईल मात्र कार्यक्रम श्लोकपठणाचा, अभंग गायनाचा वा भावगीतांचा, भक्तीगीतांचा नसून गझल कवितांचा असल्यास गझलेच्या परिभाषेतील शीर्षक वापरले तर ते योग्यच ठरते.
इथे उर्दू - फारसी भाषेला गैरहिंदू ठरवण्यात आलं.
याच अर्थाने मग मराठी ही हिंदूंची भाषा समजावी का ?
मग राज्यात राहणाऱ्या गैरहिंदूंनी मराठीत बोलू नये का ?
याही प्रश्नांची उत्तरे मिळतात.
किंबहुना असा समज असणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातलाच एखादा मुस्लीम ख्रिश्चन शीख बांधव भेटला आणि तो अगदी अस्खलित मराठी बोलू लागला की म्हणतात अरेच्चा तुम्ही मुस्लीम असूनही इतकं छान मराठी कसं बोलता ?
खरा लोचा इथेच असतो. त्या भावाला वाटत असतं की मराठी फक्त त्याचीच भाषा आहे.
भावा तसे काही नसते रे !
सर्व भाषा सर्वांच्या असतात.
कुठल्याही धर्माच्या लोकांनी कोणतीही भाषा बोलली तरी चालते.
अमुक भाषा एका धर्माची आणि तमुक भाषा तमक्या धर्माची असे विचार करणे अधिकाधिक संकुचित होत जाण्याचे लक्षण आहे.
कुणाला या अंधारात राहण्यात मजा वाटत असेल तर ते ठीक आहे मात्र आपल्या अंधारात इतरांनी सामील व्हावं हा अट्टाहास चुकीचा आहे माझ्या भावा.
हा अंधारहट्ट सोड आपण प्रकाशाची उजळण करु.
नोंद -
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाराणसी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात तिथले एक विख्यात शायर आहेत, हफ़ीज़ बनारसी हे त्यांचे नाव.
लेखाच्या प्रारंभी दिलेला शेर त्यांचाच आहे.
हवा, पाणी, भूमी, आकाश, अग्नी हे सर्वांसाठी समान आहेत त्यात भेद नाहीत तद्वतच भाषादेखील सर्वांसाठी समान आहे कोणत्या धर्माचा माणूस कोणती भाषा बोलतो याने काही फरक पडत नाही.
त्यामुळे भेदाभेद करण्यासाठी भाषेचा वापर हत्यार म्हणून करणे अयोग्य आहे इतके उमगले तरी पुरेसे. मनातला विषाद काढला तर इर्शादचा खरा अर्थ नक्कीच कळून येईल.