Unmanned boat In Pune:  भारताच्या सागरी सीमांवर शत्रू आलेत  आणि या शत्रूंचा खात्मा आपण बसल्याजागी करू शकलो तर किंवा समुद्रातील प्रत्येक हालचाल एका ठिकाणी बसून मिळाली तर ही अतिशयोक्ती वाटत असली तरी मानव विरहित बोटींमुळं हे शक्य होणार आहे. रायगड जिल्ह्यात संशयित बोट आढळल्याची घटना असो किंवा 26/11 सारख्या हल्ल्याची आलेली धमकी असो. या घटना पाहता पुन्हा एकदा सागरी सीमांच्या सुरक्षेचं आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे. हे आव्हान मानव विरहीत बोटींमुळं पेलता येणार आहे. 


रायगड जिल्ह्यात संशयित सशस्त्र बोट आढळल्याने देशात खळबळ उडाली. तर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार असा धमकीचा संदेश येताच मुंबईतील समुद्रांना सागर कवच लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत जर भारताच्या सैन्य दलात मानव विरहित बोट दाखल झाली आणि त्या बोटीने समुद्रातील प्रत्येक हालचाल आणि वेळ पडल्यास शत्रूचा खात्मा करण्यासाठी बसल्याजागी मदत केली तर सगळे संकटं दूर होतीस. ही अतिशयोक्ती नाही तर हे आता शक्य होणार आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनियरिंग कंपनीने अशा मानव विरहित बोटची निर्मिती केली आहे.


बोटीत नेमकं काय विशेष आहे?
सर्व्हीलंस कॅमेरा आणि शस्त्रासह सुसज्ज असणारी ही मानव विरहित बोट समुद्रात सोडली की तिच्यावर रिमोट, कॉम्प्युटर आणि सॅटेलाईटद्वारे नियंत्रण मिळवता येतं. ही बोट ज्या ठिकाणी पाण्यावर तरंगते त्या परिसरातील एक किलोमीटरचा 360 डिग्री व्ह्यू आपल्याला टेहळता येतो. अशावेळी जर एखादी संशयित बोट अथवा हल्लेखोर आढळले तर या कॉम्प्युटरच्या साह्याने त्यांच्यावर फायरिंग करता येतं. यामुळं भारतावर एखादा संभाव्य धोका निर्माण झाला तर तो या तंत्रज्ञानामुळं जागच्याजागी टळू शकतो.


मानव विरहित बोट इलेक्ट्रिक आणि मोटारवर चालते. समुद्रात पंचवीस किलोमीटरचं अंतर ती कापू शकते. एकावेळी दहा ते बारा तास ती प्रवास करते. शिवाय शत्रूंना या बोटीचा थांगपत्ता लागू नये, यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. समुद्रात एखादी दुर्घटना घडली आणि त्यात मनुष्य अडकला तर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुद्धा या बोटीचा उपयोग होणार आहे.


मानव विरहित ड्रोनने हल्ले झाल्याचं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे पण आता मानव विरहित बोटींमुळं शत्रूंवर निशाणा साधनं या तंत्रज्ञानामुळं शक्य होणार आहे. भारताच्या सागरी सीमांना नेहमीच सुरक्षेचं आव्हान राहिलं आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळं हे आव्हान पेलताना आपल्या भारतीय सैन्यांना मदत होणार आहे. त्यामुळं भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे.