ujani dam boat accident : उजनी जलाशयात  बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली आणि यात सहा जणांचा बळी गेल्याच्या घटनेनं अनेक प्रश्न समोर आले. कुगाव ते शिरसोडी या मंजूर झालेल्या पुलाचे काम तातडीने सुरु झाल्यास जलवाहतुकीचा प्रश्नच निकाली निघणार आहे. उजनी जलाशय हा सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला विभागणारा असून एका बाजूला करमाळा तालुका तर दुसऱ्या बाजूला इंदापूर तालुका येतो. यात दोन्ही काठावरील गावात नागरिकांची सातत्याने येणेजाणे असते. करमाळा उजनी जलाशयाच्या बाजूला असणाऱ्या गावांना दवाखाना,शाळा, कॉलेज आणि इतर अनेक कामांसाठी रोज इंदापूरकडे जावे लागते. रस्त्याच्या मार्गाने या भागातील लोकांना इंदापूरकडे जाण्यासाठी थेट 100 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यामुळेच नदीमार्गे केवळ अर्ध्या तासात इंदापूर तालुक्यात पोचता येत असल्याने हा धोकादायक प्रवास केला जात असतो . 


याचमुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत कुगाव ते शिरसोडी या मार्गावर पूल बांधण्याच्या केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी देत निधीचीही तरतूद केली आहे. आता या पुलाच्या कामाला सुरुवात झाल्यास उजनी जलाशयातील धोकादायक आणि बेकायदा जलवाहतुकीला पूर्णपणे ब्रेक लागू शकणार आहे . कुगाव ते शिरसोडी यासाठी दीड किलोमीटर लांबीचा पूल उजनी जलाशयात उभारावा लागणार असून यामुळे 100 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा याना जोडणारे हे प्रवेशद्वार होऊन तब्बल 100 किलोमीटरचे अंतरही कमी होणार आहे. करमाळा परिसर हा केळीचा हब बनला असताना येथील हा माल अतिशय कमी वेळेत पुन्हा आणि मुंबई मार्केटला जाऊ शकणार आहे. उजनी जलाशयात यामुळे सुरु असलेली धोकादायक जलवाहतुकीला देखील हा सर्वात चांगला पर्याय ठरू शकणार आहे. 


बेकायदा प्रवासी जलवाहतूक 


सध्या उजनी जलाशयाच्या 14 गावांतून नियमितपणे 16 बोटी बेकायदा प्रवासी जलवाहतूक करीत आहेत. खरेतर उजनी जलाशयात जलवाहतुकीचा परवाना देण्याची जबाबदारी उजनी धारण प्रशासनाची असून बेकायदा अशी जलवाहतूक सुरु असेल तर पोलिसांच्या मदतीने ती थांबवून गुन्हे दाखल करण्याचे अधिकार धरण प्रशासनाला आहेत. मात्र धरण प्रशासनाकडे असणारी माणसांची कमी आणि अतिशय जिकिरीची धरण व्यवस्थापन जबाबदारी यामुळे त्यांच्याकडून अशा बेकायदा जलवाहतुकीवर नियंत्रण ठेवले जात नाही. उजनी जलाशयात जर जलवाहतूक करायची असेल तर जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील मेरी संस्थेकडून बोटीचा परवाना मिळवणे आवश्यक असते. असा बोट परवाना देताना सुरक्षेच्या सर्व मानांकनांची कसून तपासणी करून असे परवाने दिले जातात. मात्र सध्या लोकांची सोया आणि यातून मिळणारे उत्पन्न यासाठी राजरोसपणे अशा धोकादायक जलवाहतूक चालू ठेवली जाते. यातून माणसांच्या सोबत जनावरे , दुचाकी आणि इतर सामान देखील वाहतूक केले जाते. या बोटी लोकल मेड म्हणजे मिळेल त्या सामानावर बनविलेल्या असतात. यात जुनी ट्रक किंवा भंगारातील इंजिने बसवून बोटी पाण्यात उतरवतात. यात कोणतीही सुरक्षा साधने नसल्याने अशा दुर्घटना सातत्याने घडत जातात. नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर आता जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे होऊ लागली आहे. 


मानांकनासह बोटींना परवाने ?


मात्र आता कारवाईचा फार्स करण्यापेक्षा जर उजनी जलाशयात जलवाहतूक सुरु ठेवायची असेल तर त्यावर कडक अटीशर्ती घालून सुरक्षा मानांकनासह बोटींना परवाने दिल्यास आणि त्यावर संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यास किमान पुढे अशा दुर्घटना होऊन निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागणार नाहीत . त्याच पद्धतीने शासनाने मंजुरी दिलेल्या कुगाव शिरसोडी मार्गावरील पुलाचे काम तातडीने झाल्यास नागरिकांसाठी मोठी सुविधा होऊन मराठवाड्याला जोडणारा कमी अंतराचा मार्ग मिळणार असल्याने याचाही मोठा फायदा मिळू शकेल .


उजनी जलाशयात धोकादायक होडी प्रवास करताना झालेल्या मोठ्या दुर्घटना 


1993  मध्ये जलवाहतूक करणाऱ्या  26  जणांना मिळाली होती दुर्दैवी जलसमाधी


करमाळा तालुक्यातील टाकळी येथे उजनी जलाशयात 1993 मध्ये टाकळी ते पळसदेव प्रवासी वाहतूक करणाऱ्या होडीचा अपघात होऊन २६ जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद तेव्हा उमटले होते.


2017 मध्ये अकलूज, माळशिरस, नातेपुते येथून सहलीसाठी गेलेल्या 4  डॉक्टरांचा इंदापूर तालुक्यातील आजोती येथे होडी उलटल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.


करमाळा तालुक्यातील केम  येथे लग्नकार्याला आलेल्या अकलूज  येथील बाप-लेकाचा उजनी जलाशयात होडी उलटून मृत्यू झाला होता. ही घटना मार्च 2019 मध्ये श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या जॅकवेलजवळ घडली होती.


जानेवारी 2022 मध्ये चिखलठाण येथे मच्छीमारांचे दोघे नातेवाईक हे  होडीतून फेरफटका मारताना त्यातील एकाने पोहण्यासाठी उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने उडी मारली, बुडणाऱ्याने गळ्याला मिठी मारल्याने दोघेही बुडाले होते .


शेवटची दुर्दैवी घटना 21 मे 24 म्हणजे दोन दिवसापूर्वी घडली असून कुगाव ते कळाशी जलप्रवास करताना 6 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे .