पुणेमास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात M.Phil ही मान्यताप्राप्त पदवी नाही, त्यामुळे एम. फील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसीने विद्यार्थ्यांना सावध केले आहे. तसेच हा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या व त्याला प्रवेश देणाऱ्या विद्यापीठांना यूजीसीने कडक इशारा दिला आहे. एम. फील. अभ्यासक्रमासाठी काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. एम.फील. ही मान्यताप्राप्त पदवी नाही. 2023-24 या शैक्षणिक वर्षात एम.फील. अभ्यासक्रमासाठी सुरू केलेली प्रवेशप्रक्रिया तत्काळ बंद करावी, असे आदेश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. मात्र 2022 पर्यंतचे प्रवेश वैध असणार आहेत, असं देखील सांगण्यात आलं आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांचं काय, त्यांच्या नोकरीत फरक पडेल का? त्यांची पदवी ग्राह्य धरली जाईल का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत. 


UGC ने विद्यापीठ अनुदान आयोग (पीएचडी पदवी पुरस्कारासाठी किमान मानके आणि प्रक्रिया) नियमावली, 2022 तयार केली आहे. जी 7 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय राजपत्रात प्रकाशित झाली आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी एम.फिल अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही विद्यापीठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी सूचना यूजीसीने दिली आहे. 


यूजीसी सचिव मनीष जोशी म्हणाले की, एम.फीलच्या प्रवेशासाठी काही विद्यापीठांनी नव्याने अर्ज मागवत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण एम. फील ही कोणतीही मान्यताप्राप्त पदवी नाही,  हे लक्षात आणून द्यावे लागेल. यूजीसी विनियम 2022 चे नियम क्रमांक 14 स्पष्टपणे नमूद करते की उच्च शैक्षणिक संस्था एम.फिल ऑफर करणार नाहीत. 2023-24 साठी एम फील अभ्यासक्रामासाठी सुरु करण्यात आलेली प्रवेशप्रक्रिया तात्काळ बंद करावी. 2022 पर्यंतचे सर्व प्रवेश वैध आहेत. 


भारतामधील काही खासगी विद्यापीठांकडून 2023-24 वर्षांसाठी एम. फील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याच्या जाहीरातीही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे निदर्शनास आलेय. पण पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पैसा आणि वेळही वाया जाईल.  मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात M.Phil ही पदवी मान्यताप्राप्त नाही. त्यामुळे कुणीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नये, असे यूजीसीकडून सांगण्यात आलेय.