Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा टोला उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) लगावला आहे. शिवसेना माझी आहे, असं मी म्हणू का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय असेही ते यावेळी म्हणाले. उदयनराजे भोसले यांनी आज कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात भेट घेतली.


विकासकामांसाठी भेट घेतली 


राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमध्ये आणखी कोणती विकासकामे करता येतील याबाबत चर्चा केल्याचे उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दीपक केसरकर आज पुणे दौरा करून सातारमध्ये जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मुक्काम करून उद्याही ते कोल्हापूरमध्ये असतील. त्यानंतर ते सिंधुदुर्गला रवाना होतील. त्यामुळे मी आज सातारमध्ये नसल्याने आज त्यांची पुण्यात भेट घेतल्याचे उदयनराजे यांनी यावेळी नमूद केले.   


मग माझी शिवसेना म्हणू का?


जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्याना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जी एकत्र आलेत ते कायमस्वरुपी एकत्र राहतील, असं दिसतंय, असेही ते यावेळी म्हणाले. शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उदयनराजे यांनी संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे, शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? असे त्यांनी उत्तर दिले. 


कोणाला मंत्रिपद द्यावे कोणाला नाही ते देणाऱ्यांनी ठरवावे, मी त्या ठरवणाऱ्यांमध्ये नाही, असे त्यांनी मंत्रिपदाच्या प्रश्नावरून उत्तर देताना सांगितले. मराठा आरक्षणावर नुसतेच पाट्या लावून फिरतात. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनाच जातीयवादी म्हणतात. मी जातपात बघत नाही. शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन? असेही उदयनराजे म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या