Pune Viral news : सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत पोलीस कायम जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. त्यात महिला आणि पुरुष असा भेदभाव न करता रात्रीबेरात्री बंदोबस्तासाठी तैनात असतात. याच कायम कणखर भूमिका बजावत असलेल्या पोलिसांची जिव्हाळ्याची बाजू देखील बघायला मिळाली. पुण्यातील (Pune) महिला पोलिसांनी (Pune police) एका परीक्षा केंद्रावर चार महिन्याच्या बाळाला मायेची उब दिली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या महिला पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 


नक्की काय घडलं?


पुणे महापालिकेच्या विविध पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु आहे. विधी अधिकारी पदासाठी पुण्यातील हडपसर परिसरातील रामटेकडी या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत पुरुषांबरोबर महिलांनीदेखील सहभाग घेतला होता. यात विवाहित महिलांसोबतच गरोदर महिलाही परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आल्या होत्या. अनेक महिला आपले लहान मुलं घेऊन नातेवाईकांनासोबत घेत परीक्षा केंद्रावर पोहचल्या. परिक्षेदरम्यान बाळांना सांभाळण्याचं मोठं आव्हान होतं. महिला परीक्षार्थींसोबत आलेल्या नातेवाईकांनी त्यांच्यासोबतच्या लहान मुलांना परीक्षा संपेपर्यंत सांभाळलं. 


याच परिक्षेला बसलेली एक महिला आपलं चार महिन्यांचं बाळ घेऊन परिक्षा केंद्रावर पोहचली. तिच्यासोबत पती देखील होते. मात्र परिक्षा केंद्रावर उमेदवारांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नव्हता. शिवाय परिक्षा केंद्राबाहेर किंवा त्या आजुबाजूला आसरा घेण्यासाठी झाडदेखील नव्हतं. त्यामुळे चार महिन्याच्या बाळाचा सांभाळ कसा करायचा? हे मोठं आव्हान बाळाच्या वडिलांसमोर होतं. वडिलांची घालमेल महिला पोलीस बघत होत्या. काही वेळाने सगळी परिस्थिती असह्य झाली आणि बाळ जोरात रडू लागलं. मात्र वडिलांना बाळाचं रडू काही थांबवता येत नव्हतं. त्यावेळी महिला पोलिसांमधील आई जागी झाली आणि त्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी पुढे सरसावल्या. त्यांनी वडिलांकडून बाळ आपल्याजवळ घेतलं. त्याच्यासोबत खेळायला सुरुवात केली. बाळाला मायेची उब देण्याचा प्रयत्न केला. त्या बाळाला कुशीत घेत आईची परीक्षा संपेपर्यंत त्याचा सांभाळ केला. या महिला पोलीसांनी नोकरी सांभाळत बाळाला मायेची उब दिली. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून महिला पोलिसांचे कौतुक केले जात आहे. 






 


भर पावसातदेखील महिला पोलीस तत्पर


पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हीच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महिला पोलिसाने (pune police) उत्तम कामगिरी केली आहे. रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये अडकलेला कचरा स्वत: दूर करत नागरिकांना वाट करुन दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसाची कामगिरी बजावत असताना त्यांनी हे सामाजिक भान राखलं. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक झालं होतं.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Pune Police: भर पावसात महिला पोलीस कचरा साफ करत नागरिकांना वाट करुन देत होत्या; व्हिडीओ व्हायरल