Unmanned Boat DRDO : महाराष्ट्रातील DRDO (Defence Research and Development Organisation ) अधिकाऱ्यांनी पुण्यात (Pune) तीन दूरस्थ मानवरहित (Unmanned boat), शस्त्रास्त्रयुक्त नौकांची चाचणी घेतली. DefExpo-2022 या प्रमुख संरक्षण प्रदर्शनापूर्वी पुण्यात ही चाचणी पार पडली. यात तीन रिमोट-कंट्रोल सशस्त्र बोटींची चाचणी करण्यात आली. बोटीवर एकही माणूस नसताना करण्यात आली.


बोटीवर कोणीही मनुष्य नसल्यामुळे, व्हिडीओ फीड ग्राऊंड कंट्रोल स्टेशनवर केलं गेलं. अनेक गोष्टीवर पाळत ठेवण्यासाठी ही बोट उपयुक्त राहिल असं DRDO संशोधनग्रुप डायरेक्टर पी.एम. नाईक म्हणाले. ही बोट टोही आणि गस्त घालण्यासाठी उपयुक्त आहे. कोणत्याही बंडखोरीच्या वेळी बोटीवर शस्त्रेही बसवली जाऊ शकतात. आमच्या टीमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही सध्या भामा आसखेड धरणावर याची चाचणी घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


पाळत ठेवण्यासाठी, गस्त घालण्यासाठी आणि एकूणच सागरी सुरक्षेसाठी या नौका उपयुक्त आहेत. शिवाय, बोटींची सहनशक्ती सुमारे चार तास असते आणि सध्या त्या जास्तीत जास्त 10 नॉटिकल मैल/तास या वेगाने जाऊ शकतात आणि ते आणखी 25 नॉटिकल मैलांपर्यंत वाढवता येऊ शकतात. या बोटींचे काही प्रकार लिथियम बॅटरीसह इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम वापरतात, तर काहींमध्ये पेट्रोल इंजिन असते. मार्चमध्ये पुढे ढकलण्यात आलेला DefExpo-2022 आता 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे, असंही ते म्हणाले.


 






 


काय आहे बोटीचं वैशिष्ट्य?


डीआरडीओची ही मानवरहित बोट इलेक्ट्रिक आणि मोटर इंजिनवर चालते आणि एका वेळी पाण्यात 24 तास सतत गस्त घालू शकते. ही बोट शत्रूंपासून वाचवण्यासाठी डीआरडीओने विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जर बोट शत्रूने ताब्यात घेतली तर त्यातील नियंत्रण फलक आपोआप नष्ट होतील. जेणेकरुन कोणतीही गोपनीय माहिती किंवा महत्त्वाचा डेटा शत्रूच्या हाती लागणार नाही. या बोटीच्या माध्यमातून देशाच्या सागरी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूला कंट्रोल रुममध्ये बसलेल्या बटणाच्या माध्यमातून संपवता येणार आहे. 


रडार यंत्रणेच्या मदतीने पाळत ठेवण्याव्यतिरिक्त ही बोट पाणबुडीविरोधी युद्ध आणि माईन्स काऊंटर मेसरमध्ये देखील काम करु शकते. DRDO च्या सहकार्याने सागर संरक्षण अभियांत्रिकी नावाच्या कंपनीने विकसित केलेले हे पूर्णपणे भारतात तयार केले आहे. पाळत ठेवणारे कॅमेरे आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली ही मानवरहित बोट एकदा समुद्रात सोडली की ती रिमोट, संगणक आणि उपग्रहांद्वारे दूरस्थपणे नियंत्रित केली जाईल. पाण्यावर तरंगणाऱ्या या बोटीच्या भोवतालच्या 1 किलोमीटरच्या 360 अंश दृश्य नियंत्रण कक्षात बसून टेहाळता येणार आहे.