पुणे : गॅस गळती होऊन स्फोट झाल्याने सहा महिन्याच्या बाळासह आई-वडील जखमी झाले आहेत. पुण्यातील खराडी परिसरातील संभाजीनगर येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शंकर भवाळे(वय 28)आशाताई शंकर भवाळे(वय 26)आणि स्वराली भवाळे(6 महिने)अशी जखमींची नावे आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या गॅसच्या स्फोटचा आवाज इतका मोठा होता, की आसपासच्या घरांनाही याची तीव्रता जाणवली.

भवाळे कुटुंब खराडी येथील संभाजीनगरमध्ये राहतात. रविवारी रात्री हे कुटुंबीय झोपेत असताना घरातील गॅस गळती होऊन संपूर्ण घरात गॅस पसरला होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आशाताई उठल्या आणि त्यांनी पाणी तापविण्यासाठी गॅस पेटवला असता मोठा स्फोट होऊन आग लागली. हा स्फोट इतका भयानक होता की यामुळे चार घरावरील पत्रे उडून गेली. तर, स्वयंपाकघरातील ओट्याचेही यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटाच्या आवाजाने शेजारपाजरच्या नागरिकांनी भवाळे कुटुंबीयांच्या घराकडे धाव घेतली.

स्फोटामुळे घराचे उडालेले पत्रे - 



या स्फोटानंतर लागलेल्या आगीत भवाळे पती-पत्नी आणि सहा महिन्यांची स्वराली भाजले आहेत. यातील सहा महिन्याच्या स्वरालीची प्रकृती गंभीर आहे. आगीमुळे घरातील सर्व साहित्य आणि कपडे जळाले आहेत. भिंतीवरील सिमेंटही खाली पडले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. तर, जखमी पती-पत्नी आणि मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गॅस गळतीमुळे स्फोट?
गॅस सिलिंडरला गळती लागल्याने रात्रभर गॅस संपूर्ण घरात पसरला होता. त्यात घराची कोणतीही खिडकी उघडी नसल्याने हा गॅस घरातच कोंडून राहिला. त्यामुळे घरात एक प्रकारचा दबाव तयार झाला होता. त्यामुळे गॅस पेटवताना घरातील गॅसने आग पकडल्याने मोठा स्फोट झाला. घरातील गॅसचे प्रमाण जास्त असल्याने या स्फोटाची तीव्रताही अधिक होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, सकाळी गॅस पेटवताना घरातील दारे, खिडक्या उघड्या कराव्यात त्यानंतरच थोड्या वेळाने गॅस पेटवण्याचा सल्ला यातील तज्ज्ञांनी दिला आहे.

Badlapur MIDC | बदलापूर एमआयडीसी कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू | ABP Majha