गुवाहाटी : देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आसाममधील डिब्रूगड आणि चरादेव जिल्ह्यात रविवारी सकाळी चार शक्तिशाली ग्रेनेड स्फोट झाले. डिब्रूगडमध्ये तीन आणि चराईदेवमध्ये एक स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितलं. या स्फोटात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.


प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच जोरदार धमाक्याचा आवाज आला. डिब्रूगड जिल्ह्यात एक स्फोट ग्रॅहम बाजारात झाला तर दुसरा एटी रोडवरील एका गुरुद्वाराच्या पाठीमागे झाला. दोन्ही भाग डिब्रूगड पोलिस ठाण्यांतर्गत आहेत. दुलिजन तेल शहरात दुसरा स्फोट झाला तिथून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक स्फोट चरादेव जिल्ह्यातील सोनारी पोलिस स्टेशन परिसरातील टिओक घाट भागात झाला. या स्फोटाचा आत्ता खुलासा झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ अधिकारी स्फोटस्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


दिल्लीत कडेकोट बंदोबस्त -
71 व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा दिल्लीतल्या राजपथावर पार पडला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या खास सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्रपती जायर मेसियास बोल्सिनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पथसंचलनातून लष्करी सामर्थ्याचं जगाला दर्शन घडवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत येणाऱ्या सर्व बॉर्डरवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी ड्रोनची करडी नजर असणार आहे. दिल्लीतील सर्व प्रवेशाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. मेट्रोची पार्किंग सकाळपासून आज दुपार दोनपर्यंत बंद करण्यात आली आहे. देशभरातही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जम्मू काश्मीरच्या सर्वच जिल्ह्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि अन्य ठिकाणी पोलीसांची सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Republic Day Parade | प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजपथावर तिन्ही दलांचं शक्तिप्रदर्शन | नवी दिल्ली