Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरे ( Amit Thackeray) यांनी पुणे दौऱ्यादरम्यान डॅशिंग मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांना तातडीने भेटायला बोलावून घेतलं आहे. वसंत मोरे मागील काही दिवसांपासून मनसेवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या  (Pune Mns) आणि त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. याच पाश्वभूमीवर वसंत मोरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा होणार किंवा कोणता तोडगा निघणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्या दरम्यान त्यांनी वसंत मोरे यांना भेटीसाठी बोलवलं आहे. नाराजी दूर करण्यासाठी मनविसेचे प्रमुख अमित ठाकरे मध्यस्थी करणार असल्याची शक्यता आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी देखील वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही वसंत  मोरे आणि स्थानिक नेत्यांमध्ये धूसफुस सुरुच होती. मनसेचे अंतर्गत वाद रोज चव्हाट्यावर येत होते. हे अंतर्गत वाद दूर करण्यासाठी अमित ठाकरेंनी पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. 


'मनसेच्या बैठकीत मोरेंनी मारली होती दांडी'


मनसेच्या अंतर्गत वादामुळे काही प्रमाणात मनसेत दोन गट पडले आहेत. वसंत मोरे यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्याबद्दल भूमिका पक्ष दोन दिवसात घेणार, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली होती. निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासोबत चारशे जणांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यात मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत बाबू वागस्कर यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत वसंत मोरे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.


अजित पवारांच्या ऑफरचं काय?


काही दिवसांपूर्वी वसंत मोरें यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली होती. 'तात्या, कधी येताय, वाट पाहतोय,’ असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल भाषेत वसंत मोरेंना राष्ट्रावादीत बोलावलं होतं. त्यामुळे आता वसंत मोरेंना अमित ठाकरेंनी बोलवल्यामुळे राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय 'तात्या काहीही करा पण मनसे सोडू नका', अशा प्रतिक्रीया वसंत मोरेंचे चाहते देत आहे.