Temghar Dam Leakage : पुण्याला (Pune) पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणावर (Temghar Dam) आतापर्यंत 500 कोटी रुपये खर्च करुनही धरणातून होणारी पाणी गळती थांबलेली नाही. भिंतीतून उडणारे पाण्याचे फवारे त्याचा पुरावा आहेत. पावणे चार टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या धरणाची गळती थांबवण्यात 90 टक्के यश आल्याचा दावा एकीकडे जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र एबीपी माझाने टेमघर धरणातून धोकादायक पद्धतीने होणारी पाणी गळती समोर आणल्यानंतर जलसंपदा विभागाकडून (Water Resources Department) धरणाच्या दुरुस्ती आणि मजबुतीसाठी आणखी 200 कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. 


एबीपी माझाकडून पाणी गळती उघड, अनेक अधिकाऱ्यांचं निलंबन


एबीपी माझाने या टेमघर धरणातून धोकादायक पद्धतीने होणारी पाणी गळती 2016 साली उघडकीस आणल्यानंतर जलसंपदा विभागाकडून अनेक अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आल आणि त्यानंतर या धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. हे धरण 2000 साली मंजूर झालं तेव्हा ते 250 कोटी रुपयांचं होतं. पुढे यावर पाचशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही धरणाची ही अवस्था जैसे थे राहिल्याने आणखी 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 



  • 2000 साली पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात या धरणाला मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी 250 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

  • या धरणाचे काम सोमा एंटरप्रायजेस या कंपनीला देण्यात आलं.

  • अविनाश भोसले हे या सोमा एंटरप्रायजेसच्या अनेक संचालकांपैकी एक होते.

  • 2000 साली सुरु झालेलं धरणाचं काम 2010 साली पूर्ण करण्यात आलं.

  • मात्र धरणाच्या भिंतींना मजबूत करण्यासाठी आवश्यक असलेलं ग्राऊटिंगचं काम करण्यात आलं नाही.

  • धरणाच्या भिंतींमधे होल्स करुन त्यामधे सिमेंट-कॉंक्रिट भरण्याला ग्राऊटिंग म्हटलं जातं.

  • मात्र टेमघर धरणाच्या बाबतीत ही प्रक्रियाच न करण्यात आल्याने हे धरण सुरुवातीपासूनच गळायला लागलं.  

  • पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर या धरणांच्या साखळीतील हे धरण 2017 पासून मागील पाच वर्षं दुरुस्तीच्या नावाखाली रिकामं करण्यात येत आहे. 


या धरणात सध्या मृत साठा शिल्लक आहे. मागील पाच वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली हे धरण पावसाळ्यानंतर लगेच रिकामं करण्यात येत. अर्थात याचा परिणाम पुणे शहराच्या पिण्याच्या पाणायावर आणि ग्रामीण भागाच्या शेतीच्या पाण्यावर होत आहे. 


धरण बांधणाऱ्या सोमा एंटरप्रायजेस कंपनीवर कोणतीही कारवाई नाही


एबीपी माझाने या धरणाची गळती दाखवल्यानंतर जलसंपदा विभागातील 32 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण हे धरण बांधणाऱ्या सोमा एंटरप्रायजेस कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी हे धरण उत्तम पद्धतीने बांधल्याबद्दल सोमा एंटरप्रायजेसच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला होता. पुढे फडणवीस सरकारच्या काळात देखील सोमा एंटरप्रायजेसवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि अधिकाऱ्यांचं निलंबनही मागे घेण्यात आलं आणि आता पुन्हा 200 कोटी रुपयांची मागणी होत आहे. 


टेमघर पॅटर्न दुरुस्तीचा की पैसे जिरवण्याचा?


जलसंपदा विभागाकडून टेमघर धरणा गळती यशस्वीरित्या दूर करण्यात आल्याचा दावा मधल्या काळात करण्यात आला. एवढंच नाही तर दुरुस्तीचा हा टेमघर पॅटर्न गळणाऱ्या इतर धरणांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं. पण धरणातून सुरु असलेली ही पाणी गळती काही थांबलेली नाही.  त्यामुळे हा टेमघर पॅटर्न दुरुस्तीचा आहे की पैसे जिरवण्याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


या प्रश्नांची उत्तरे जलसंपदा विभाग देणार?


या धरणाची 90 टक्के गळती रोखण्यात यश आल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. हा दावा जर खरा असेल तर मग हे धरण दरवर्षी रिकाम का करण्यात येतं, हा दावा जर खरा असेल तर आणखी 200 कोटी रुपयांची मागणी का करण्यात येतेय आणि हा दावा जर खरा असेल तर या धरणाच्या भिंतीतून उडणारे हे फवारे कशामुळे उडतात, या प्रश्नाची उत्तरं जलसंपदा विभागाला द्यायची आहेत. तसं धरणाच्या या गळतीला कारणीभूत असलेल्या कंत्राटदाराकडून आतापर्यंत किती दंड वसूल करण्यात आला या प्रश्नाचही उत्तर द्यायचं आहे.