बारामती : तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड झालं आहे. बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. त्यात तन्मय फडणवीसने हेल्थ वर्कर म्हणून लस घेतल्याचं समोर आलं आहे. तन्मय फडणवीस हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू आहेत.
काही दिवसांपूर्वी तन्मय फडणवीसने कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही घेतली होती. लस घेतानाचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावरुन मोठा वादंग झाला होता. तन्मयचं ट्विटर अकाऊंट पाहिले तर त्याने अभिनेता असल्याचे नमूद केलं आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना आरोग्य कर्मचारी म्हणून त्याने उल्लेख केला असल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे.
Tanmay Fadnavis Vaccination प्रकरणावर देवेंद्र फडणवीस म्हणतात....
काय आहे प्रकरण?
एप्रिल महिन्यात देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर लसीकरणाचा एका फोटो शेअर केला होता. त्यावेळी देशात केवळ 45 वर्षांवरील नागरिकांनाचा कोरोना लस घेण्याची अट होती. असं असताना फारच कमी वयाच्या तन्मयने नागपुरात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याने लगेचच तो फोटो डिलीट केला. परंतु काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅण्डलवर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस घेणाऱ्या तन्मयचा फोटो शेअर केला. "तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रण्टलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?" असे प्रश्न काँग्रेसने विचारले होते.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
"तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी 18 वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
तर याच प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. "कायदा सगळ्यांना समान आहे," असं अमृता फडणवीस म्हणाल्या. "कोणीही नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. कायद्याचा अवलंब करावा. आम्ही नेहमी कायद्याच्या बाजूने आहोत. या मुद्द्यावर आम्ही तुमच्यासोबत आहोत. याप्रकरणी कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात अशी कृती पुन्हा होणार नाही," असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
कोण आहे तन्मय फडणवीस?
तन्मय हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आहे. तन्मयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर 'अॅक्टर' असं लिहिलं असून इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये 'पब्लिक फीगर' असा उल्लेख आहे. अभिजीत फडणवीस हे शोभा फडणवीस यांचे पुत्र आहेत. शोभा फडणवीस या माजी मंत्री देखील होत्या.