मुंबई : सध्या देशात 45 वर्षांवरील लोकांनाच कोरोनाची लस दिली जात आहे. परंतु विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तरुण पुतण्या तन्मय फडणवीसने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याने काँग्रेसने जोरदार टीका केली. महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करुन "फडणवीस यांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर #tanmayfadnavis हा हॅशटॅग ट्विटर ट्रेण्ड होत आहे. या सगळ्या प्रकारावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


"तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी 18 वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


देवेंद्र फडणवीस यांनी तन्मय फडणवीस लसीकरण प्रकरणाबद्दल कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या कार्यालयाने यासंदर्भ लेखी निवेदन जाहीर केलं. "या प्रकरणासंदर्भात कालच माझ्या कार्यालयातून लेखी निवेदन देण्यात आले असून त्या प्रकरणाबद्दल तिच माझी भूमिका आहे," असं फडणवीस म्हणाले.


Tanmay Fadnavis Memes | 'चाचा विधायक है हमारे', ट्रोलर्सच्या निशाण्यावर तन्मय फडणवीस; 'ये फस गया' म्हणत अनेक मीम्स व्हायरल


तर याच प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कायदा सगळ्यांना समान आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. "कोणीही नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. कायद्याचा अवलंब करावा. आम्ही नेहमी कायद्याच्या बाजूने आहोत. या मुद्द्यावर आम्ही तुमच्यासोबत आहोत. याप्रकरणी कारवाई करावी, जेणेकरुन भविष्यात अशी कृती पुन्हा होणार नाही," असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.






 


काय आहे प्रकरण?


देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर लसीकरणाचा एका फोटो शेअर केला होता. सध्या केवळ 45 वर्षांवरील नागरिकांनाचा कोरोना लस घेण्याची अट असताना फारच कमी वयाच्या तन्मयने नागपुरात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याने लगेचच तो फोटो डिलीट केला. परंतु काँग्रेसने आपल्या ट्विटर हॅण्डलवर नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लस घेणाऱ्या तन्मयचा फोटो शेअर केला. "तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रण्टलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी? भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?" असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत.


कोण आहे तन्मय फडणवीस?


तन्मय हा देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचा मुलगा आहे. तन्मयने आपल्या ट्विटर हॅण्डलवर 'अॅक्टर' असं लिहिलं असून इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये 'पब्लिक फीगर' असा उल्लेख आहे. अभिजीत फडणवीस हे शोभा फडणवीस यांचे पुत्र आहेत. शोभा फडणवीस या माजी मंत्री देखील होत्या.