Tanmay Fadnavis Memes कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण प्रक्रियेलाही चांगलाच वेग मिळाला आहे. देशात सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर येत्या 1 मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. असं असलं तरीही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने त्याआधीच कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं सोशल मीडियावर सांगितलं, आणि मग काय; काँग्रेससह अनेकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तिथे महाराष्ट्र काँग्रेसने ट्वीट करुन "फडणवीस यांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?" असा प्रश्न उपस्थित केला असतानाच दुसरीकडे ट्रोलर्सनाही आता एक नवा विषय मिळाला असून, तन्मय फडणवीसच्या नावे असंख्य मीम्स व्हायरस केले जात आहेत.
चित्रपट, वेब सीरिजमधील संवादांचा संदर्भ देत हे मीम्स सध्या कमालीचे ट्रेंडमध्ये आले आहेत. चाचा विधायक है हमारे, हे मीम सध्या चांगलंच लक्ष वेधून जात आहे. तर तन्मय कसा फसला, यासंदर्भातील एक मीमही सोशल मीडियावर दिसून येत असून, त्याच्यावर या माध्यमातून निशाणा साधला जात आहे.
तन्मय फ्रंटलाईन वर्कर आहे का, इथपासून ते अगदी यामध्ये देवेंद्र फडणवीसांनीच मदत केलेली असावी इथपर्यंचे मीम अनेक युजर्सच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, तन्मय फडणवीसने हा फोटो स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. केवळ 45 वर्षांवरील नागरिकांनाचा कोरोना लस घेण्याची अट असताना फारच कमी वयाच्या तन्मयने नागपुरात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याने लगेचच तो फोटो डिलीट केला होता. पण, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मात्र त्याच्या या पोस्टनं सर्वांच्या नजरा वळवल्या आणि या चर्चांना उधाण आलं.