पुणे : वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला भुशी डॅमला (Lonavala Bhushi Dam) गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाचा शोध सुरू आहे. ही घटना ताजी असताना पुण्यातील ताम्हिणी घाटातील एक दुर्घटना समोर आली आहे. ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. स्वप्नील धावडे असं या तरुणाचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला होता. शनिवारी गा ग्रुप ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे गेला होता. स्वप्नील हा पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रहिवाशी आहे. ताम्हिणी घाटात गेलेल्या स्वप्नील धावडेने पाण्यात उडी मारल्यानंतर तो जोरदार प्रवाहात बेपत्ता झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो उंचावरून धबधब्यात उडी मारताना दिसत आहे.
दोन दिवसांनी मृतदेह सापडला
सतत पडणाऱ्या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पौड पोलिस, ताम्हिणी वनविभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती, शिवदुर्ग टीम लोणावळाने प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन्ही कुंडांमध्ये आणि आसपासच्या परिसरात स्वप्नीलचा शोध घेतला. मात्र, या टीमला कोठेही स्वप्नील आढळला नाही. दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत या परिसरात शोधकार्य सुरू होते. आजही सकाळी पुन्हा या ठिकाणी शोधकार्य सुरू होते. आज मृतदेह रायगड जिल्ह्यातील मानगाव येथे आढळून आला.
नेमकं काय घडलं?
स्वप्नील धावडे हे जीम ट्रेनर पुणे जिल्ह्यातील ताम्हीणी घाटातील प्लस व्हॅली भागात शनिवारी गेले होते. जीममधे ट्रेनिंग देतात तिथले तरुण आणि त्यांची स्वतःची मुलगी होती. प्लस व्हॅली मधे एकुण तीन कुंड आहेत. पहिल्या कुंडातील पाणी धबधब्यातून वाहत मधल्या कुंडात जाते आणि तिथून ते सर्वात खाली असलेल्या कुंडात जाते. स्वप्नील धावडे आणि त्यांची टीम पावसाळा सुरु होण्यापूर्वी याच कुंडांमधे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तेव्हा पाण्याला फार जोर नव्हता. शनिवारी ते आणि त्यांची टीम पुन्हा प्लस व्हॅली मधील सर्वात वरच्या कुंडाजवळ गेले. स्वप्नील धावडे यांनी त्यांच्या जीम मधील सहकाऱ्यांसमोर फेसाळत्या पाण्यात उडी मारली. सुरुवातीला त्यांनी काठावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र धबधब्याच्या टोकाला आल्यानंतर त्यांची दगडावरील पकड निसटली आणि ते धबधब्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते भारतीय सैन्यात सामील झाले होते. 18 वर्षांच्या सेवेनंतर ते मागील वर्षी निवृत्त झाले होते. त्यांची पत्नी पिंपरी चिंचवड पोलिस दलात कार्यरत आहेत.
ताम्हिणी अभयरण्यात 30 सप्टेंबरपर्यंत बंदी
पावसाळा सुरू असल्याने अनेकजण वर्षा पर्यटनासाठी ताम्हिणी वन्यजीव अभयरण्यात जातात; परंतु हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे ताम्हिणी अभयारण्यातील प्लस व्हॅलीमध्ये, पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत 30 जून पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. ताम्हिणी परिसरात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते. धबधब्यातील कुंडामध्ये पाण्याच्या प्रवाहाचा व खोलीचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन