पुणे : स्वारगेट (Swarget) परिसर म्हणजे सध्या लुटीचे ठिकाण बनले आहे. स्वारगेट बस स्थानकामुळे येथे देशभरातून प्रवाशांची सतत गर्दी असते. मात्र याच गर्दीचा फायदा घेत एसटी स्टॅन्ड आणि पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी (Pune Police) केला आहे. तब्बल 13 लाख रुपये किंमतीचे 120 मोबाईल आणि तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.
पुण्यातील स्वारगेट परिसर हा कायम गजबजलेला असतो. जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. या गर्दीच फायदा घेत ही टोळी नागरिकांचे मोबाईल चोरी करत असे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट एसटी स्टँड परिसरातून मोबाईल चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी स्वारगेट पोलीस ठाणे दाखल होत होत्या. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. एके दिवशी एक इसम स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याने स्वारगेट परिसरामध्ये 100 ते 150 मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले
120 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन जप्त
इम्रान ताज शेख असे मुख्य आरोपीचे नाव असून इतर तीन जणांना सुद्धा याप्रकरणी अटक केली आहे. आरोपींकडून आत्तापर्यंत एकूण 12 लाख रुपये किंमतीचे एकूण 120 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन आणि एक लाख रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे तीन लॅपटॉप तसेच सॉफ्टवेअर मारण्याचे एकूण तीन डिव्हाईस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
महिला प्रवाशांकडील ऐवजावर चोरांची नजर
बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यांच्या या जाचावर कोण लगाम घालणार असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एसटी स्थानक आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस थांब्यावर प्रवाशांच्या, विशेषत: महिला प्रवाशांकडील ऐवजावर चोरांची नजर असल्याचे दिसून येते. स्वारगेट एसटी स्थानक आणि पीएमपीत सोन्याचे दागिने, मोबाईल चोरांना अटकाव करण्यात स्वारगेट पोलिसांना अपयश आले आहे. या परिसरात कायमच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. बस आणि ‘एसटी’साठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन चोरटे प्रवाशांच्या किमती ऐवजावर नजर ठेवून असतात. बसमध्ये चढताना प्रवासी बेसावध असतात, त्या वेळी चोरटे डाव साधतात. त्यामुळे प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
हे ही वाचा :
मुंबईच्या अंधेरीत प्रियकराने प्रेयसीचा काटा काढला, घरात एकटी असताना ओढणी गळ्याभोवती गुंडाळली अन्...