पुणे: बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मुक आंदोलनं केली जात आहेत. पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ‘निषेध आंदोलन’ करण्यात आलं आहे. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी सकाळी 10 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत एक तास हे मुक आंदोलन पार पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी याबाबत बोलताना ही घटना घडली त्यांची नोंद पोलिसांनी घेतली नाही त्यामुळे ही कृती वारंवार घडत राहिली, पोलिसांची त्यांच्या वर्दीची भीती राहिली नाही, असं म्हटलं आहे. (Supriya Sule Criticizes The Mahayuti Government over baldapur school incident and maharashtra crime in MVS muk Morcha)


पुण्यातच अनेक घटना घडल्या, इथे रक्त बदलण्यात आलं, ड्रग्ज प्रकरणे वारंवार समोर येतात, कोयता गँग अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे, बदलापूरातील आंदोलनानंतर सरकारमधील नेत्यांनी म्हटलं आंदोलन करणारे बाहेरचे होते, पण ते कोणत्या का ठिकाणावरून येवो, ते भारतीय होते आणि ते भारतीय लेकीसाठी तिथे लढत होते. याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे. पण नंतर समोर आलं ती जनता ते आंदोलक बदलापूरमधील होते, ते आपल्या लेकीसाठी लढत होते, यातून सरकार कोणता विचार करतं ते लक्षात येतं, ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं म्हणत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.


पुणे जिल्ह्यात एक बलात्कार झाला, हे कृत्य करणाऱ्या नराधमाला दोन महिन्यात आम्ही फाशी दिली असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, जर हे सत्य असेल तर आपण सर्वजण मुख्यमंत्र्याचा सत्कार करायला जाऊ असंही सुळेंनी यावेळी म्हटलं आहे. तर बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत संवेदनशील आहे, ही फक्त त्यांची लेक नाही, ही आपली देखील लेक आहे. सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकींची जबाबदारी आपण सगळे घेऊयात. मविआच्या सर्व पक्षांनी मिळून ही जबाबदारी घेऊ आजनंतर कोणत्या लेकीवर अशी वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 


आपण राजकारण बाजूला ठेवून राज्याच्या मुलींसाठी आपण जबाबदारी घेऊ, सर्वांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे, सर्व पालकांनी समोर आलं पाहिजे, असं काही घडत असेल तर ते समोर आलं पाहिजे, नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


तर सर्व समाज माध्यमांनी हा विषय अगदी संवेदनशील पध्दतीन हाताळल्याने त्यांनी माध्यमांचे देखील आभार मानले आहेत, तर अशा घटना घडल्या त्या पालकांची, किंवा पिडित मुलींची नावे, ओळख किंवा त्यांची ओळख होईल अशी कोणतीही माहिती समोर आणू नये, जेणेकरून त्यांना कोणताही त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट करू नये. अगदी संवेदनशील पध्दतीने सर्व विषय हाताळले गेले पाहिजेत असं आवहन देखील यावेळी सुळेंनी केलं आहे.