पुणे: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने  (Heavy Rain) हजेरी लावली आहे, पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं असल्याने राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, तर पुणे शहर परिसरात पाऊस दुपारच्या सुमारास हजेरी लावत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं.


राज्यात आगामी चार दिवसांमध्ये म्हणजेच शनिवार ते मंगळवार या चार दिवसांत मान्सून जोरदार सक्रिय होत असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा  (Heavy Rain)  इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, मुंबई, पालघरसह इतर 13 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर 28 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले असल्यामुळे पुन्हा एकदा पावसाचा जोर  (Heavy Rain) वाढला आहे. त्यामुळे आज(शनिवार) ते मंगळवार, (दि. 27) ऑगस्ट या कालावधीत राज्यात मान्सून जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


आजपासून चार दिवस पुणे शहरात मुसळधार पावसाची शक्यता


राज्यभरात मान्सून सक्रिय झाल्याने पुणे घाटमाथ्याला हवामान विभागाने 24 ते 27 ऑगस्ट हे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरावर क्युम्युनोलिंबस (पांढऱ्या रंगाचे बाष्पयुक्त ढग) वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक जमा झाले आहेत. त्यामुळे ज्या भागात हे ढग जास्त आहेत त्या ठिकाणी मुसळधार  (Heavy Rain) तर ज्या भागात ढग कमी आहेत तेथे कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. 


मंगळवारी यलो अलर्ट


शनिवार ते सोमवार (दि. 24  ते 26) हे तीन दिवस पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट तर मंगळवारी (दि. 27) यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क रहावं, आवश्क असल्यास घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, त्याचबरोबर घराबाहेर जाताना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर जावे. झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.


या जिल्ह्यात पावसाची शक्यता


छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी, नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.