Sunil Shelke on Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke)यांच्यावर कार्यकर्त्यांना धमकावल्याचा आरोप केला होता. आता सुनिल शेळके यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मला किंवा माझ्या भावाला मंत्री व्हायचं नाही. मात्र,अजित पवार मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी रणनिती सुरुय, त्यांना करोडो रुपये खर्च करुन ट्रोल केलं जात आहे", असा गंभीर आरोप आमदार सुनिल शेळके यांनी केलाय. आमदार सुनील शेळके तळेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांनी माझ्या राजकीय जीवनावर प्रश्न चिन्ह निर्माण केलय
सुनिल शेळके म्हणाले, शरद पवार यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका असं मी कोणालाच म्हटलं नाही. तरीही शरद पवार यांनी माझ्यावर आरोप केला. त्यामुळे काही क्षणात माझ्या राजकीय जीवनावर प्रश्न चिन्ह निर्माण केलय, हे मला योग्य वाटत नाही. म्हणून मी शरद पवारांची भेट घेऊन एवढं टोकाला का गेलात? असं विचारणार असल्याचे सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांना ट्रोल करण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च
मला किंवा माझ्या भावाला मंत्री व्हायचं नाही. मात्र, अजित पवार मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी काहीजण रणनीती आखत आहेत. यासाठी करोडो रुपये खर्च करून अजित पवारांना ट्रोल केलं जात आहे. याविषयीच्या गोष्टी मला पुढे आणाव्या लागतील असा इशाराही शेळके यांनी दिलाय.
काय म्हणाले होते शरद पवार?
मला 'शरद पवार' म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी आमदार सुनील शेळकेंवर हल्लाबोल केला होता. लोणावळ्याच्या सभेत शरद पवार यांनी सुनिल शेळकेंवर आरोपही केले होते. शरद पवार म्हणाले होते की, सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, अशा शब्दात पवारांनी सुनील शेळकेंवर घणाघात केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या