पुणे : बारामती लोकसभेसाठी (Baramati Loksbha Election) दोन्ही पवार गटांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसली तरी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) अशीच लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्याचमुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. अजित पवारांनी (Ajit Pawar) सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत होतं, पण आता शरद पवारांनी (Sharad Pawar)  आपला पहिला डाव टाकलाय. शरद पवारांनी काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे (Anantrao Thopate) यांच्या भोरमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. थोपटे यांच्यासोबतचा गेल्या 40 वर्षांपासून असलेला संघर्ष मिटवण्यासाठी भोरमध्ये जाणीवपूर्वक पहिल्या सभेचं आयोजन करण्यात आलं. 


बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात आज सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते. काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांच्या पुढाकारातून या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. 


चाळीस वर्षांच्या संघर्षावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 


भोरमधील सभेआधी शरद पवार यांनी आमदार संग्राम थोपटेंचे वडील आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून राजकीय संघर्ष होत आला. दोन्ही नेते काँग्रेस पक्षात असताना एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात.त्यानंतर हा राजकीय संघर्ष अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे आणि अजित पवार यांच्यामधेही पहायला मिळाला. 


शरद पवारांकडून भोरची जाणीवपूर्वक निवड


आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे आव्हान आहे. ते लक्षात घेता शरद पवारांकडून अनंतराव थोपटेंसोबत असलेल्या जुन्या संघर्षाच्या इतिहासाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न या भेटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघातील पहिल्या सभेसाठी भोरची जाणीवपूर्वक निवड केल्याच मानण्यात येतंय.


सुनेत्रा पवारांना जड जाणार


बारामती मतदारसंघातील सध्याची गणितं लक्षात घेता भोरच्या संग्राम थोपटेंची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांनी अनंतराव थोपटेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आता स्वतः शरद पवारांनीच सूत्रं हाती घेत थोपटे-पवार हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येत्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


ही बातमी वाचा: