पिंपरी- चिंचवड : भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शिखरावर पोहचवणाऱ्या आयटी क्षेत्रात ही बुरसटलेले विचार काही प्रमाणात पाय रोवून आहेत. हे अधोरेखित करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील घटना पुरेशी आहे. आयटी अभियंता प्रसून कुमार झा च्या आत्महत्येनंतर समोर आलेलं कारण हे धक्कादायक आहे.
प्रेयसीला अधिकचा पगार असल्याने प्रसून तिच्याशी वाद घालत असून तिच्यावर शंकाही घेत असे. आज सकाळी दोघांमध्ये खटके उडाले आणि त्यानंतर प्रसूनने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी घेतली. 28 वर्षीय आत्महत्या केलेला आयटी अभियंता प्रसून आणि प्रेयसी एकाच नामांकित आयटी कंपनीत काम करायचे. 2014 साली दोघांची मैत्री झाली, या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांचे लग्नही ठरले. गेली नऊ महिने दोघे ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र प्रेयसीला प्रसून कुमार झा पेक्षा एक लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज अधिक होतं. त्यातच ती दुसऱ्या कंपनीत मोठ्या पॅकेजवर नोकरीसाठी जाणार होती. ही बाब प्रसूनला वेळोवेळी खटकू लागली. कालांतराने तो तिच्यावर शंका ही घेऊ लागला.
पैशापेक्षा आयुष्य महत्वाचं आहे, असं प्रसून प्रेयसीला वारंवार म्हणू लागला. पण भविष्याचा विचार करता आयुष्यात पैसा ही महत्वाचा आहे, यावर प्रेयसीने प्रकाश टाकला. पण आज सकाळी दोघांमध्ये याच विषयावर खटके उडाले. आता आपल्या विवाहाबाबत माझे कुटुंबीय पुढचा निर्णय घेतील, असं प्रेयसीने ठणकावले आणि प्रसूनला घरातून हाकलून दिले. मग प्रसून वाकड येथील लॉरेल सोसायटीत आला. तिथं सहाव्या मजल्यावर तो दोन मित्रांसमवेत फ्लॅटमध्ये स्वतःसाठी राखीव जागा ठेवली होती. तो आला तेव्हा दोन्ही मित्र त्यांच्या खोलीत होते, मग दुपारी दीडच्या सुमारास फ्लॅटमधून बाहेर आला. सुरक्षा रक्षकाकडून टेरेसची चावी घेतली आणि बाराव्या मजल्यावर गेला. तिथं स्वतःचा मोबाईल ठेवून त्याने उडी घेत, आत्महत्या केली. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत. केवळ अशिक्षितांमध्येच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या युगात जगणाऱ्या काही आयटी अभियंत्यांमध्ये आजही असे विचार असल्याचं या घटनेने अधोरेखित केलं आहे.
संबंधित बातम्या :