पुणे : मुळचा परभणीचा असलेला नागनाथ भालेराव पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी आला होता. पार्ट टाईम जॉब करुन स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करायचा, असं त्याचं दिनक्रम होता. पण आता कोरोनाच्या संकटाने सगळंच बदलून गेलं आहे. पोट रिकामं असेल तर कसा अभ्यास करणार? मी दत्तवाडी परिसरात राहतो. हॉटस्पॉट असल्याने हा सगळा भाग सील केला आहे. सकाळपासून काही खायला नाही. मदत म्हणून मिळत असलेलं फूड पॅकेट घ्यायला कित्येक किलोमीटर चालत जावं लागतं. कसं राहणार आम्ही इथे? का राहायचं? नागनाथ बोलताना म्हणाला.


माझ्या घरचे मोलमजूरी करतात. लॉकडाऊनमुळे त्यांचंही काम बंद आहे. ते मला पैसे पाठवू शकत नाहीत. मी कसं राहणार पुण्यात? नागनाथ म्हणाला. फक्त नागनाथच नाही तर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा अडचणींचा सामना करावा लागतोय आणि म्हणून सरकारने आम्हाला आमच्या घरी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत.


पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येतातच. पण फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. सुमारे एक लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात आहेत. यातील काही विद्यार्थी लॉकडाऊनच्या आधी घरी गेले. लॉकडाऊनच्या या काळात पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची आम्ही यादी करतोय आणि हा आकडा आता 2300 वर गेला आहे, एमपीएससी स्टुडंट राईट असोसिएशनचा महेश बडे याने ही माहिती दिली.


24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला, पण या विद्यार्थ्यांचं जेवणाचाच प्रश्न आहे. सुरुवातीचे काही दिवस हे विविध संघटनांनी जेवण दिलं. पण ते किती दिवस पुरणार? एमपीएससी स्टुडंट राईट असोसिएशन बाकी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या विद्यार्थींना दोन वेळचं जेवण पुरवण्याचा उपक्रम सुरु केला. तो आतापर्यंत सुरु आहे. पण आमची ताकद ही 3 मे पर्यंतच आहे. त्यानंतर काय करायचं यांनी? महेश बडेने सांगितलं.


कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अनिश्चिततेच सावट आहे. 15 मार्चला एमपीएससाकडून घेण्यात येणारी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदासाठीची परिक्षा होती. तोपर्यंत पुण्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि कोरोनाच्या सावटाखालीच ही परीक्षा पार पडली. राज्य आयोगची पूर्व परीक्षा 4 एप्रिलला होणार होती. पण मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोना फैलावत गेला होता. पुणे शहरातील शाळा, कॉलेजेस बंद झाले होते. याचसोबत स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिकाही ओस पडू लागल्या होत्या. त्यानंतर शहरातील खानावळी बंद होऊ लागल्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात राहताना प्रामुख्याने अभ्यासिका आणि खानावळींवर अवलंबून असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आपआपल्या गावाचा रस्ता धरला. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचं 4 एप्रिलला होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठीचं परिक्षा केंद्र हे पुणे होतं. पण अभ्यास आणि जेवणाचीच आबाळ व्हायला लागल्यावर तोपर्यंत काय होतं ते बघू, असं म्हणून काही विद्यार्थी घरी गेले.


या सगळ्या अस्थिर परिस्थितीमध्ये ही परिक्षा पुढे ढकलावी अशी मागणी होऊ लागली. ही परीक्षा पुढे ढकलून 26 एप्रिलला होईल, असं सांगण्यात आलं. पण तोपर्यंत प्रवासाचे साधनं उपलब्ध नव्हते. आता तर सगळ्याच परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. संदिग्ध मनस्थितीमध्ये पुण्यात राहिलेल्या विद्यार्थ्यांचे घरी जायचे सगळे रस्तेच बंद झाले. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी पुण्यात येतात. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. पुण्यामध्ये शेअरिंग रुम घेऊन हे विद्यार्थी राहतात. या शेअरिॅग रुममध्ये स्वयंपाक करण्याची सोयही नसते.

लॉकडाऊनमुळे सगळं बंद झाल्यावर पुण्यात अडकलेल्या या विद्यार्थ्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. खोलीचं भाडं कसं भरायचं? जेवणाची सोय कशी करायची? परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्यावर आता इथे राहून काय करायचं असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. भविष्याचा कोणताही विचार नाही केलाय आत्ता. आम्हाला फक्त घरी जायचं आहे. आता या परिस्थितीमध्ये पुण्यात नाही राहू शकत, नागनाथ भालेरावने सांगितलं. बुलढाण्याचा अमोल वानखडेही घरी जाण्यासाठी उत्सुक आहे. माझे घरचे काळजी करतात. कसं राहायचं इथे? आमच्या आरोग्यालाही इथे राहून धोखा आहे. जर सरकार कोट्यातला मुलांना इथे यायला परवानगी देऊ शकतं तर राज्यातला राज्यात जायला परवानगी द्यायला हवी, असं अमोलने सांगतलं. कोट्याच्या धर्तीवर आम्हालाही घरी जाऊद्या, असं या विद्यार्थांचं म्हणणं आहे. गावाकडे जाऊन हवंतर 14 दिवस क्वारंटाईन राहतो. पूर्ण काळजी घेऊन राहतो पण घरी जाऊ द्या, अशी विनवणी हे विद्यार्थी करत आहेत.