Sugarcane workers : यावर्षी ऊसाचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing) येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. साखर आयुक्तांनी तसे निर्देश दिले आहेत. मात्र, त्याआधीच ऊसतोड मजूर (Sugarcane workers) ऊसतोडीसाठी दाखल झाले आहेत. 1 ऑक्टोबरला ऊसाचा गाळप हंगाम सुरु होणार म्हणून ऊसतोड मजूर  त्यांच्या गावावरून कारखान्यावर दाखल झाले आहेत. पंरतू, गळीत हंगाम पुढे ढकलल्यामुळं ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील विविध भागांतील ऊसतोड मजूर टोळ्यांनी कारखान्यावर ठाण मांडलं आहे. त्यांच्या हाताला सध्या काम नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.


यंदाच्या वर्षी साखर कारखाने 1 ऑक्टोबर रोजी सुरु करणार असं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं होते. मात्र, ही तारीख बदलण्यात आली आहे. आता ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार आहे. जे साखर कारखाने 15 ऑक्टोबरच्या आधी सुरु करतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचे साखर आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. मात्र, ऊसतोड मजूर 1 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरु होणार म्हणून कारखान्यावर दाखळ झाले आहेत. मात्र, सध्या त्यांच्या हाताला काम नसल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील विविध भागांतील ऊसतोड मजूर टोळ्यांनी कारखान्यावर ठाण मांडलं आहे. 




25 सप्टेंबरपासून  मजूर कारखान्यावर दाखल  


1 ऑक्टोबरला कारखाना सुरु होणार म्हणून मालक आम्हाला घेऊन आला आहे. इथं आणल्यावर आम्हाला सांगितले की कारखाना 15 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. त्यामुळं आता आमच्या हाताला काम नाही. त्यामुळं लेबरच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती ऊसतोड मजुराने दिली आहे. मालकाने आम्हाला खोट बालून याठिकाणी आणलं असल्याचेही मजुरांनी सांगितले. 25 सप्टेंबरपासून आम्ही कारखान्यावर आलो आहोत. अजून कारखाना सुरु झाला नाही. मालकाने आधीच सांगितले असते तर दसरा झाल्यावर आम्ही आलो असतो. आता आमच्याकडे खाण्यासाठी पैसे नाहीत असे ऊसतोड कामगारांनी सांगितलं.


 साखर आयुक्तांनी गळीत हंगाम कोणाच्या संगण्यावरुन पुढे ढकलला, शेतकरी संघटनेचा सवाल


साखर आयुक्तांनी 1 ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरू होईल असं सांगितलं होतं. परंतू, आता 15 ऑक्टोबरच्या आत जे कारखाने सुरु होतील त्या कारखान्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करणार असल्याचे साखर आयुक्तांनी परिपत्रकात सांगितले आहे. यंदाच्या गळीत हंगामात 14.84 लाख हेक्टर एवढं क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यामुळं यंदाही पुन्हा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 1 ऑक्टोबरचा गळीत हंगाम पुढे का ढकलला असा सवाल शेतकरी संघटनेनं साखर आयुक्तांना विचारला आहे. साखर आयुक्तांनी गळीत हंगाम कोणाच्या संगण्यावरुन पुढे ढकलला असा सवाल शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केला आहे. साखर आयुक्तांना फौजदारी गुन्हे दाखल करायचे आहेत ते गुन्हे ज्या कारखान्यांनी FRP दिली नाही त्यांच्यावर करा अशी मागणी रायते यांनी केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: