Pune Crime News: मध्यरात्रीच्या सुमारास साळुंके विहार रस्त्यावर थांबलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली. दुचाकीस्वार थांबला आणि अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देण्याचे मान्य केले. मात्र काही अंतर गेल्यानंतर ते अनोळखी दरोडेखोर निघाले आणि त्यांनी तरुणाला धमकावून त्याची दुचाकी पळवून नेली. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला.


आकाश गुप्ता असं दुचाकीस्वाराचे नाव असून तो मार्केट यार्ड येथील रहिवासी असून त्याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने रोहित रामप्रसाद वर्मा (18, रा. वानवडी) या दरोडेखोरांना अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीची चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.


नक्की काय घडलं?
 मध्यरात्रीच्या सुमारास आकाश हा साळुंके रोड परिसरातून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी जश्न हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला लिफ्ट मागितली. त्यानंतर आकाशने दुचाकी थांबवून त्यांना लिफ्ट देण्याचे मान्य केले. काही अंतर पार केल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी आकाशला धमकावून त्याची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी घेऊन पळ काढला.


वर्मा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्ह्यांमध्ये सात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 1.25 लाख रुपये किमतीच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


वाहन चोरी गेल्यास काय कराल?
-शोधाशोध न करता पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल करावा.
- अनेकदा चुकीच्या ठिकाणी पार्क केली असता वाहन टोचन करूनही नेलेले असू शकते.
-वाहन चोरी झाल्यास एफआयआर दाखल करावा. 
- विमा क्लेम करायचा असेल तर एफआयआर महत्वाचा ठरतो.
- त्यानंतर लगेत विमा कंपनीला या संदर्भातील माहिती द्या.
-क्लेम फार्म भरावा लागणार.
-फॉर्ममध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर, गाडीची माहिती भरावी लागेल. 
-वाहन चोरीची घटना कुठे झाली, वेळ ही सगळी माहिती द्यावी लागेल. 
-वाहन कंपनी गाडीच्या दोन चाव्या कायम देते. 
-चाव्या नसतील तर क्लेम नाकारु शकतात.