पुणे : सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. पण म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा मात्र तुटवडा आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या घटतेय ही समाधानकारक बाब आहे. परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. 


रेमडेसिवीर आणि म्युकरमायोसिसबाबतकाय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, "सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. मात्र रेमडेसिवीरचा जास्त वापर नको, असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. परंतु म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा मात्र तुटवडा आहे, त्यामुळे आम्ही ही इंजेक्शन्स मिळवण्यासाठी संबंधित कंपन्यांना संपर्क केला. परंतु ठरल्याप्रमाणे तयार होणारी इंजेक्शन्स आधी केंद्र सरकारला द्यावी लागणार आहेत, असं कंपन्यांनी सांगितलं. त्यामुळे कोणत्या राज्याला किती इंजेक्शन द्यायची हे केंद्र सरकारच ठरवणार आहे.


गरजेनुसार लसीचा पुरवठा नाही : अजित पवार
लसीच्या पुरठवठ्यावरुन अजित पवार म्हणाले की, "देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे. पण लसींचा पुरवठा जेवढा व्हायला हवा तेवढा होत नाही. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणं सुरु आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक लस निर्मितीचे प्रमाण वाढवत आहेत."


पंतप्रधान महाराष्ट्रात आले असते तर बरं झालं असतं : अजित पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा पाहणी दौरा केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली होती. याविषयी अजित पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी मुंबईत येणार आणि त्यानंतर ते गुजरातला जाणार असं ठरलं होतं. परंतु नंतर त्यांनी मुंबई दौरा रद्द केला आणि ते फक्त गुजरातला गेले. त्यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्र देखील भारतातच आहे.  पंतप्रधान जर मुंबईत आले असते तर इथल्या लोकांनाही बरं वाटलं असतं."


'उजनीच्या पाण्याबाबत जयंत पाटलांनी भूमिका स्पष्ट केलीय'
शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्यासह शिवसेनेच्या तीव्र विरोधाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, "उजनी धरणाच्या पाण्याच्या बाबतीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली असून तसा आदेश काढला आहे. त्यानंतर देखील कोणाला काही करायचं असेल तर त्यांनी करावं."


कोणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका
"पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय तो सर्वांना मान्य करावाच लागेल. समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे," असं अजित पवार म्हणाले.