शिवाजीराव भोसले बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले, सुर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले या चौघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. तर याप्रकरणी एकूण 16 आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंकेत ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने फिर्यादी यांच्या कंपनीला बॅंकेच्या रोख व शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते. यावेळी बॅंकेकडे 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्थिक गुन्हे शाखेने तपास केला. त्यामध्ये कर्जप्रकरणांमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आणखी एका संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच बॅंकेतील ठेवी, कर्ज प्रकरणे आदीचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या ऑडिटर कंपनीचीही चौकशी केली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा : आमदार अनिल भोसले यांना अटक
शिवाजीराव सहकारी बॅंकेने नियमबाह्य पद्धतीने कर्जांचं वाटप केल्याचं आणि संचालकांच्या नातेवाईकांनाच कर्ज दिल्याचं उघड झाल्यावर, रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली होती. अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानपरिषदेचे आमदार झाले. मात्र तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला होता.
अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या नगरसेविका आहेत. या घोटाळ्याप्रकरणी ज्या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये रेश्मा भोसले यांचाही समावेश आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतर्फे 71 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार असून या घोटाळ्याच्या व्याप्ती आणखी वाढू शकते. बॅंकेचे हजारो ठेवीदार त्यांचे पैसे अडकल्याने संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी करत होते.
ऑडिटमध्ये घोटाळा उघड
भारतीय रिझर्व्ह बँकने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे 2018-19 वर्षाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बँकेचे ऑडिट केले असता, त्यात सुरुवातीला 71 कोटी 78 लाख रुपये कमी असल्याचे आढळले. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आमदार भोसले यांच्यासह शैलेश भोसले, तानाजी पडवळ, विष्णू जगताप आणि हनुमान सोरते यांच्यासह 11 पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीए योगेश लकडे यांनी याबाबत तक्रार दिली होती. भोसले यांच्यासह 11 जणांनी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या. बँकेच्या एकूण 14 शाखा असून, 16 हजार खातेदार आहेत. बँकेकडून आतापर्यंत 12 कोटी रुपयांची कर्ज वसुली करण्यात आली आहे.