पुणे : इंदापूरच्या विद्यमान आमदारांमुळे संपूर्ण राज्यात इंदापूरचं नांव बदनाम झालं, कुठे पाहुण्या-रावळ्यांकडे गेलो तरी लोक मलिदा गँगबद्दल विचारतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली. इथल्या आमदारांच्या कृत्याचा परिणाम लोकसभेला सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारालादेखील भोगावा लागला असल्याचं त्यांनी म्हटलं. महारुद्र पाटील यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर टीका केली. 


देवेंद्र फडणवीसांचा प्रवीण मानेंवर दबाव 


लोकसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि इंदापूरच्या राजकारणातील युवा नेते प्रवीण माने यांच्यावरती मोठा दबाव टाकला होता, म्हणून ते अजित पवार गटात गेले असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केला.


उद्या पक्ष ज्याला कोणाला विधानसभेचे तिकीट देईल त्याचं आम्ही काम करू, त्यामुळे प्रवीण मानेंकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं महारुद्र पाटील यांनी म्हटलं. प्रवीण माने यांना सुप्रिया सुळे यांविरोधात काम करायचे असते तर ते गाव भेट दौऱ्यात सहभागी झाले नसते असंही महारुद्र पाटील म्हणाले.


लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुप्रिया सुळेंसाठी प्रवीण मानेंनी इंदापूर तालुक्यातील साठ-सत्तर गावांमध्ये दौरा केला होता, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असं म्हणत महारुद्र पाटील यानी प्रवीण माने यांचे शरद पवार गटात घरवापसीचे संकेत दिले. 


इंदापूरमधून महायुतीचे तिकीट कुणाला? 


लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे हे व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आले होते. त्यानंतर या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य मिळालं. 


इंदापूरच्या जागेवर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचा दावा असून आगामी विधानसभेमध्ये या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे दत्ता भरणे हे विद्यमान आमदार असून भाजपचे हर्षवर्धन पाटील हेदेखील इच्छुक आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. 


इंदापूरच्या जागेवरून मतभेद असले तरी त्यावर सामोपचाराने मार्ग काढण्यात येईल असं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे ही जागा अजित पवार आपल्याकडे कायम ठेवणार की भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना संधी मिळणार हे निवडणुकीवेळीच स्पष्ट होईल. 


ही बातमी वाचा: