पिंपरी चिंचवड: आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना आपल्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसल्यावर अजित पवार (Ajit Pawar) खडबडून जागे झाल्याचं चित्र आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी घड्याळ सोडून शरद पवारांची तुतारी फुंकल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) तातडीने उर्वरित पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. उद्या (गुरूवारी) सकाळी 8:30 वाजता पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नव्या शहराध्यक्षांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच उर्वरित पदाधिकाऱ्यांनी तुतारी फुंकू नये, या अनुषंगाने खबरदारी सुद्धा घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांनी काल (मंगळवारी) आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश झाला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे देखील उपस्थित होते.
अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?
अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंडवडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे काम झालं होतं. गेल्या २०१७ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहराची मोठ्या प्रमाणावर अधोगती झाल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे भोसरी विधानसभा हा भाग सर्वांत जास्त मागे पडलेला आहे. सत्ता असताना देखील काही विकासकामे झालेली नाहीत. एकहाती सत्ता अजित पवारांकडे (Ajit Pawar) नव्हती. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही अजित दादांना सोडून शरद पवारांसोत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितलं आहे.
संबधित बातम्या: Ajit Gavhane: अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? अजित गव्हाणेंनी दिलं उत्तर, म्हणाले 'सत्ता असूनही...'